Malegaon Bomb Blast | मालेगाव येथील २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्त्वपूर्ण निकाल अखेर समोर आला आहे. विशेष एनआयए कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गेल्या १७ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा निकाल आज जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. Malegaon Bomb Blast | कोर्टात काय घडलं ? न्यायाधीश लाहोटी यांच्या कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. निकाल वाचन करताना न्यायालयाने एक महत्त्वाच निरीक्षण नोंदवलं. बॉम्बस्फोटासाठी ज्या बाईकचा वापर झाला, ती बाईक साध्वींची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. आरोपींमध्ये बैठका झाल्याचा किंवा कट रचल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांना मिळालेला नाही, आरोपींच्या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे आढळले नाहीत, आरोपी प्रसाद पुरोहित यांनी अभिनव भारत संस्थेचा निधी स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा उपलब्ध नाही, असे कोर्टाने नमूद केले आहे. नेमकं प्रकरण काय? 29 सप्टेंबर 2008 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कोण होते आरोपी? साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांचा हा कट असल्याचे म्हंटले गेले. हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर होता. सुरुवातीला ATS कडे हा तपास होता, नंतर एनआयएकडे हा तपास वर्ग करण्यात आला. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हेही वाचा : Dhananjay Powar : “आमची महादेवी आम्हाला परत द्या”; धनंजय पोवाराची सरकारकडे मागणी, भावनिक Video केला शेअर म्हणाला…