Koynanagar : मळे- कोळणे- पाथरपुंज ग्रामस्थ आक्रमक; वन्यजीव विभागाच्या कार्यालयांना टाळे, पुनर्वसनासाठी रास्ता रोको
Koynanagar : मळे-कोळणे आणि पाथरपुंज ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी वन्यजीव विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोकून कराड-चिपळूण मार्गावर रास्ता रोको केला.

Koynanagar : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या मळे- कोळणे व पाथरपुंज येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नी अनेक वर्षांपासून आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत तिन्ही गावांतील बाधित ग्रामस्थांनी सोमवारी आक्रमक आंदोलन केले. मळे येथील वनसंरक्षक कुटी आणि हेळवाक येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर हेळवाक चौकात कराड- चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’ करण्यात आला.
पुनर्वसनाचा प्रश्न लांबण्यास प्रशासनाचा उदासीन कारभार कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वारंवार पाठपुरावा करुनही ठोस निर्णय होत नसल्याने आता ‘आश्वासनांचे गाजर’ नको, तर प्रत्यक्ष पुनर्वसनाची कार्यवाही हवी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. पुनर्वसन संघर्ष समितीचे समन्वयक संजय यशवंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता मळे (कोळणे गेट) येथील वनसंरक्षक कुटी तसेच हेळवाक येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. सुमारे २० ते २५ ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले.
यानंतर हेळवाक चौकात कराड- चिपळूण मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, आंदोलन शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, संजय कांबळे यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामगावकर तसेच उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगत त्यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर कांबळे यांच्यासह दोन प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील मासिक पुनर्वसन सभेसाठी रवाना झाले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांवर पुनर्वसन संघर्ष समितीने आता आरपारच्या लढाईची भूमिका घेतली आहे. केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून पुनर्वसनाचा ठोस निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा पवित्रा समितीने घेतला आहे. त्यामुळे आगामी पुनर्वसन बैठकीत प्रशासनाकडून कोणती ठोस भूमिका घेतली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.





