Malayalam Bigg Boss 7: लेस्बियन कपलची ‘बिग बॉस मलयाळम 7’मध्ये एंट्री….

Malayalam Bigg Boss 7: ‘बिग बॉस 19’ अजून सुरू व्हायचं आहे, पण ‘बिग बॉस मलयाळम’चा सातवा सीझन सुरुवातीलाच प्रचंड चर्चेत आला आहे. कारण, या शोमध्ये लेस्बियन कपल आदिला नसरीन आणि फातिमा नूरा स्पर्धक म्हणून दाखल झाल्या आहेत. त्यांच्या एंट्रीनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, अनेकांनी या धाडसी पावलाचं कौतुक केलं आहे.
प्रेमाची सुरुवात आणि संघर्ष
आदिला आणि फातिमाची पहिली भेट सऊदी अरेबियामध्ये शिक्षण घेताना झाली. सुरुवातीला दोघींच्यात फक्त मैत्री होती, पण कालांतराने ही मैत्री प्रेमात बदलली. मात्र, या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि समाजाकडून तीव्र विरोध झाला. त्यांना वेगळं करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
कोर्टाची लढाई आणि निकाल
कुटुंबीयांच्या विरोधानंतर आदिला आणि फातिमाने हार न मानता केरळ हायकोर्टात हॅबियस कॉर्पस याचिका दाखल केली. त्यांच्या प्रेम आणि एकत्र राहण्याच्या हक्कासाठी त्यांनी कोर्टात लढा दिला आणि अखेर कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल देत त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी अधिकृतरीत्या लग्न केलं.
बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट
या लेस्बियन कपलच्या एंट्रीमुळे ‘बिग बॉस मलयाळम 7’ सुरू होताच चर्चेचा विषय बनला आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यात ओपन नॉमिनेशन आणि स्पॉट एलिमिनेशनसारखे अनपेक्षित ट्विस्ट आले, ज्यामुळे प्रेक्षक चांगलेच थक्क झाले आहेत. शो मेकर्सनी या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी भरपूर नवे प्रयोग करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याची झलक पहिल्याच आठवड्यात दिसून आली आहे.
सध्या आदिला आणि फातिमा यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या धैर्याची आणि नात्यावरील विश्वासाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. या एंट्रीमुळे ‘बिग बॉस मलयाळम 7’ची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





