पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवले जीवन; मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई – मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर यांचे निधन झाले आहे. अभिनेत्री तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. अपर्णा नायरचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी प्राथमिक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मल्याळम सिने-सिरियल अभिनेत्री अपर्णा नायर तिरुअनंतपुरम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, अपर्णा पती आणि मुलांसोबत राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय अभिनेत्री अपर्णा नायरने चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. काल रात्री करमनाजवळील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. या अभिनेत्रीचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला रुग्णालयाकडून माहिती मिळाली आणि अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असून या दुर्दैवी पाऊलामागे कौटुंबिक समस्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास सुरू करण्यात आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.


