प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवले जीवन ! फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नवी दिल्ली – मल्याळम अभिनेत्री (Malayalam actress) रेंजुषा मेनन थिरुअनंतपुरममधील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय रेंजुषा मेनन तिचा अभिनेता पती मनोजसह रहात होती. या फ्लॅटमध्येच रेंजुषा (Renjusha Menon) लटकलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या मृत्यूच्या वेळी ती आर्थिक समस्यांमधून जात असल्याचे समजते. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजते. मात्र या प्रकरणी पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
कोची (Kochi) रहिवासी रेंजुषा मेननने टीव्ही मालिकांमध्ये येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिने छोट्या पडद्यावर ‘स्त्री’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली आणि अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. ‘सिटी ऑफ गॉड’, ‘मारिकुंडोरू कुंजाडू’, ‘बॉम्बे मार्च’, ‘कार्यस्थान’, ‘वन वे तिकीट’, ‘अथभूता धीपू’ यासह अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी ती ओळखली जाते. या भूमिकांमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली होती.
मेनन हिने अनेक मालिकांची निर्माता म्हणूनही काम केले. याशिवाय ती एक व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना देखील होती. त्यांच्या कुटुंबात वडील सीजी रवींद्रनाथ आणि आई उमादेवी यांचा समावेश आहे.
मृत्यूच्या काही तास आधी, रेंजुषाने इंस्टाग्रामवर ‘आनंद रगम’ सह-कलाकार श्रीदेवी अनिलसोबत एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला होता.


