Malavli Railway Station: मळवली रेल्वे स्थानकाबाहेर ‘मृत्यूचा सापळा’; चिखलमय रस्त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
Malavli Railway Station: मळवली उड्डाणपुलाच्या कामासाठी टाकलेली माती पावसामुळे चिखलात; पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल.

Malavli Railway Station – तालुक्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच मळवली येथील उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामातील नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. पुलाच्या कामासाठी टाकण्यात आलेली माती पावसामुळे पूर्णपणे चिखलात बदलल्याने पर्यायी रस्ता अत्यंत निसरडा बनला असून, दररोज हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वेने प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, दुग्ध व्यवसायिक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मळवली रेल्वे स्थानक गाठण्यासाठी या चिखलमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. चिखलामुळे अनेक प्रवासी घसरून पडत असून, काहींना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वे पकडण्याच्या घाईत अनेकांना या धोकादायक मार्गावरून धावावे लागत असल्याने अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे.
केवळ पादचारीच नव्हे, तर या मार्गावरून जाणारे दुचाकीस्वारही निसरड्या रस्त्यामुळे घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न करता उड्डाणपुलाचे काम सुरू केल्याने सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
रस्त्यावर साचलेला चिखल तातडीने हटवून खडी टाकून मार्ग सुरक्षित करावा, अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा संतप्त प्रवाशांनी दिला आहे. दरम्यान, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्ता सुरक्षित करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.





