Malaika Arora: घटस्फोटानंतर टीका आणि विरोध सहन केला; लवकर लग्न केल्याचा पश्चाताप – मलायका अरोरा

Malaika Arora: मलायका अरोराने नुकतच तिच्या घटस्फोटाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर तिला प्रचंड टीका आणि विरोध सहन करावा लागला, असं तिनं सांगितलं. हा विरोध फक्त समाजाकडूनच नव्हे, तर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाकडूनही झाला, असं ती म्हणाली.
मलायका आणि अरबाज यांनी २०१६ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत मलायकाने सांगितलं की, त्या काळात तिच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारले जात होते. तरीही तिनं स्वतःच्या आनंदाला प्राधान्य दिलं आणि निर्णयावर ठाम राहिली. “मला पुढे काय होणार आहे हे माहीत नव्हतं, पण त्या क्षणी बदल करणं माझ्यासाठी गरजेचं होतं,” असं ती म्हणाली.
मलायकाच्या मते, स्त्रियांना स्वतःचा आनंद निवडल्यावर जास्त प्रश्न विचारले जातात, पण पुरुषांना तसे प्रश्न सहसा विचारले जात नाहीत. हे पितृसत्ताक समाजाचं वास्तव असल्याचं तिनं सांगितलं.
लग्नाबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, तिला लग्न या संकल्पनेवर विश्वास आहे; पण ते प्रत्येकासाठीच योग्य असेल, असं नाही. लग्न किंवा प्रेम जबरदस्तीने शोधण्यापेक्षा ते नैसर्गिकपणे घडावं, असं तिला वाटतं.
तरुणांना सल्ला देताना मलायकाने स्पष्टपणे सांगितलं की, लहान वयात लग्न करू नये. लग्नाआधी आयुष्य अनुभवणं, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्वावलंबी होणं खूप महत्त्वाचं आहे. लवकर लग्न केल्याचा तिला पश्चाताप असल्याचंही तिनं प्रामाणिकपणे मान्य केलं.





