Makrand Patil – विधानसभा निवडणुकीत पश्चिम भागाने मला साडेतेरा हजार मतांची आघाडी दिली होती. या भागातील जनतेने जे जे मागितले ते आपण पूर्ण केले. असे असतानाही विरोधकांच्या भुलभुलैया बळी पडून पश्चिम भागातील गुणी, प्रेमळ माणसेही चुकीच्या मार्गावर गेली याच आश्चर्य वाटते. या भागाच्या विकासात कसलेही योगदान नसणाऱ्या बोलघेवड्यानी नुसत्या रावणाच्या गप्पा मारण्यापेक्षा किमान आपल्या गावातील रस्त्याची खड्डे बुजवण्याचे तरी योगदान द्यावे, अशी उपरोधिक टीका मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली. चिखली, ता. वाई येथे चिखली विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. पाटील बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य बापूसाहेब शिंदे, पंचायत सभापती विक्रांत डोंगरे, प्रतापराव पवार, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी संजय मांढरे, युवानेते बाजीराव वाडकर, चंद्रकांत शेलार यांच्यासह चेअरमन बाळासाहेब वाडकर, व्हाइस चेअरमन अनिता शिंदे, रमेश वाडकर, नामदेव मांढरे, वैशाली मांढरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. चिखली विकास सेवा सोसायटी अमृत महोत्सव ना. पाटील यांनी संस्थेच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करताना सांगितले की, छोट्याशा रोपट्यापासून आज वटवृक्ष झालेली ही संस्था अनेकांच्या योगदानातून उभी राहिली आहे. बाळासाहेब वाडकर यांच्या वडिलांनी चेअरमन म्हणून सुरू केलेल्या संस्थेचा अमृत महोत्सव त्यांच्या सुपुत्रांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणे हा एक दुर्मिळ योगायोग आहे.बापूसाहेब शिंदे यांनी संस्थेत आर्थिक शिस्त रुजवली असून कोणतेही नगदी पीक नसताना चिखली सोसायटीचे कर्जवाटप आणि इतर प्रगती आदर्शवत आहे. यावेळी बापूसाहेब शिंदे, विक्रांत डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सुनील चोरगे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव वाडकर यांनी आभार मानले. सर्व सभासदांना अमृत महोत्सवानिमित्त मंत्री आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब चिरगुटे हाच माझा राजकीय वारसदार – बापूसाहेब शिंदे जिल्हा परिषद निवडणूकीत बाळासाहेब चिरगुटे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मला निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्याच्यामुळेच मी ८० व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो. बाळासाहेबांचा त्याग शिंदे कुटुंब कधीही विसरणार नसून आमचे राजकीय वारसदार बाळासाहेब चिरगुटे असतील, असे बापूसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले.