Priyanka Gandhi : सोनिया-मुर्मू प्रकरणाचा मुद्दा बनवणे जनतेचा अवमान; प्रियंका गांधी यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीवरून नुकतेच वादंग निर्माण झाले. मात्र, त्या प्रकरणाला निवडणुकीचा मुद्दा बनवणे हा महागाई, बेरोजगारीसारख्या समस्यांशी झुंजणाऱ्या जनतेचा अपमान आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसद अधिवेशनाचा प्रारंभ झाला. त्यावर सोनियांनी दिलेली प्रतिक्रिया वादंग निर्माण करणारी ठरली. बिचाऱ्या महिला, राष्ट्रपती अभिभाषणाच्या अखेरीस अतिशय थकलेल्या वाटत होत्या, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यावरून भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली. मोदींनीही दिल्लीतील प्रचार सभेत बोलताना आदिवासींचा, गरिबांचा अपमान झाल्याचे म्हटले. त्यावरून प्रियंका यांनी प्रचारसभेत बोलताना पलटवार केला.
वयाने ज्येष्ठ असणाऱ्या महिलेने दुसऱ्या ज्येष्ठ महिलेविषयी सहानुभूती व्यक्त केली. त्या विषयाला निवडणुकीचा मुद्दा बनवले जात आहे. कुठल्या प्रकारचा तो मुद्दा आहे? जनतेशी निगडीत मुद्द्यांवर बोलण्याऐवजी निरर्थक बाबींवर बोलले जात आहे, असे त्या म्हणाल्या. कालच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, अर्थसंकल्पीय भाषणातही महागाईविषयी एक शब्दही उच्चारण्यात आला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.





