ममता, अखिलेश, केजरीवाल यांना कॅप्टन बनवा; इंडियाच्या बैठकीत वेगवेगळे प्रस्ताव

नवी दिल्ली – इंडिया या विरोधी पक्षांच्या बैठकीत वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात आले. त्यानुसार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल या नेत्यांना त्यांचा प्रभाव असणाऱ्या राज्यांत कॅप्टन बनवण्याचे सुचवण्यात आले.
ममता आणि केजरीवाल यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयी मांडलेला प्रस्ताव मंगळवारच्या बैठकीत मागे पडला.
मात्र, त्यातून कॉंग्रेस पक्षाला आघाडीतील मोठा भाऊ मानण्यास इतर पक्ष तयार असल्याचे समोर आले. तसे असले तरी, बलवान असलेल्या पक्षाला त्या-त्या राज्यात झुकते माप दिले जावे, अशी कॉंग्रेसेतर पक्षांची भावना असल्याचेही दडून राहिले नाही.
त्या भावनेतूनच तृणमूल कॉंग्रेसने काही नेत्यांना कॅप्टन करण्याविषयी सुचवले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप राज्य पातळीवर करण्याचा निर्णय इंडियाने घेतला आहे. त्यामुळे तृणमूलचा प्रस्ताव महत्वाचा मानला जात आहे.
पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली, पंजाबसारख्या राज्यांत जागावाटप निश्चित करताना इंडियाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. तो विचार करून तृणमूलने संबंधित प्रस्ताव दिल्याचे समजते.
लोकसभेच्या देशभरातील एकूण ५४३ पैकी सुमारे ३०० जागा लढण्यासाठी कॉंग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे काही राज्यांत कॉंग्रेसने इतर पक्षांकडे सुत्रे सोपवावीत, असे तृणमूलचे म्हणणे आहे.
चालू महिन्याच्या अखेरपर्यंत जागावाटप निश्चित करावे, अशी आग्रही भूमिकाही तृणमूलने मांडली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने चालू महिन्याच्या अखेरीस राज्यस्तरीय जागावाटप निश्चित करून त्याला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंतिम रूप देण्याचे सुचवले. कॉंग्रेसलाही ते मान्य असल्याचे सूचित झाले.





