धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा : मनोज जरांगे

बीड : मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोग येथे भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करून धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. तसेच चारशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. यात धनंजय मुंडे यांचा हात आहे. त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले की, राज्य सरकार बदनामीच्या दिशेने चालले आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. विनाकारण वेठीस धरले जात आहे. तपास यंत्रणा किती स्ट्रॉन्ग आहे ते यावरून कळत आहे. वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली. प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्याला सह आरोपी केले नाही, त्यांना सर्वात जास्त यातील माहिती आहे. यातील कोणत्याच आरोपींना सह आरोपी केले नाही. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देखील सह आरोपी करा. त्यांनी आंदोलन दडपले होते. या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत नाही, असं जरांगे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे देखील यात आहेत. टोळ्या सांभाळण्याचा त्यांना नाद आहे. यातील आरोपी त्यांचेच आहे त्यामुळे त्यांना सह आरोपी करा, अशी मागणी त्यांनी केली. तर सरकारला माहित आहे की यात धनंजय मुंडे यांचा हात आहे, असा दावा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केला.
पुढे म्हणाले की, खंडणीतून हा खून झाला आहे. यातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे. यातील आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत? माझे आरोप नाही तर हे सत्य आहे. सरकार यात बदनाम होत आहे. ही केस अंडरट्रायल चालली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे. आरोपींना अटक करतील अशी शक्यता नाही. मुख्यमंत्र्यांनी यात आदेश द्यावे. आम्ही सर्वजण त्यांची पाठ थोपटू, असं मनोज जरांगे म्हणाले.
मस्साजोगचे ग्रामस्थ २५ तारखेला उपोषण करणार
मनोज जरांगे यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन केला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवल्याचं जरांगे पाटील म्हणाले. मस्साजोगचे ग्रामस्थ २५ तारखेला उपोषण करणार आहेत. हा विषय खूप संवेदनशील आहे. निवेदन असलं तरी सहकार्य करा. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करा, बाकीच्या आरोपींची सीडीआर काढा, अशी मागणी गावकरी आणि मनोज जरांगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.



