Baramati News | अवजड वाहनांवर क्लीनर बंधनकारक करा..

प्रभात वृत्तसेवा
डोर्लेवाडी – बारामती शहरात रविवार (दि.26) बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात डंपरच्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातातील डंपरला चालकाबरोबर क्लीनर असता तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे हायवा, डंपर, ट्रक आणि अवजड वाहनांना क्लीनर बंधनकारक करावा, यासाठी बारामतीतील पत्रकारांनी बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती प्रांत अधिकारी तसेच बारामती वाहतूक पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
बारामती शहरात प्रचंड प्रमाणात लहान- मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेकदा वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत. त्यातूनच छोटे- मोठे अपघात सतत घडत आहेत. डंपरने तीन जणाला चिरडले, या पार्श्वभूमीवर बारामतीतील संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात रास्ता रोको करीत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला. बारामतीतील महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, रहदारीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमावा, हायवा, डंपर, ट्रक आणि अवजड वाहनांना क्लीनर बंधनकारक करावा.
रस्त्यांवर डंपर, हायवा, ट्रक आदी अवजड वाहने ये जा करताना वाहनांवर चालकाबरोबर क्लीनर सोबत असायला हवा, जेणेकरून होणारे अपघात व मृत्यू टाळता येऊ शकतात. अनेकदा अवजड वाहनांवरील चालक मद्दधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळत आहेत. याबाबत वाहन मालकावर दंडात्मक कारवाई तसेच चालकाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी बारामतीतील पत्रकार नवनाथ बोरकर, निलेश जाधव, स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख, दीपक कापरे, अजिंक्य सातकर, सूरज देवकाते, संजय भिसे, तुषार ओहोळ यांनी निवेदन दिले आहे.





