नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी शपथविधीनंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भावूक होत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचे साकडे दिल्लीकरांना घातले. दिल्ली विधानसभा निवडणूक ४ ते ५ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याचा संदर्भ देऊन आतिशी यांनी केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे नंतर सोशल मीडियावरही भावना व्यक्त करताना म्हटले. दोन्ही व्यासपीठांवरून भाजपला लक्ष्य करतानाच त्यांनी केजरीवाल यांची तोंडभरून प्रशंसा केली. त्यांनी केजरीवाल यांचा उल्लेख राजकीय गुरू, मोठे बंधू म्हणून केला. केजरीवाल सामान्य माणसाच्या वेदना जाणतात. त्यामुळेच त्यांनी शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या. मोफत वीज पुरवली. त्यांनी मागील १० वर्षांत दिल्लीचे चित्र पालटवले. ते मुख्यमंत्रिपदी नसणे हा आमच्यासाठी अतिशय भावूक क्षण आहे, असे त्या म्हणाल्या. भाजपने खोट्या प्रकरणात केजरीवाल यांना गोवले. ते मोडून पडावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, आता केजरीवाल तुरूंगाबाहेर आले आहेत. त्यामुळे भाजपचे कुठलेच कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार आतिशी यांनी बोलून दाखवला. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यातून त्यांनी राजकारणात नैतिकतेचे आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आतिशी यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प जाहीर केला. केजरीवाल यांना ज्या स्थितीत राजीनामा द्यावा लागला त्यामुळे दिल्लीकर दुखावले असल्याचा दावाही त्यांनी केला.