मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड

मुंबई: महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत’ मोठा घोटाळा उघड झाला आहे. तब्बल १२ हजार ४३१ पुरुषांनी बनावट नोंदणी करून जवळपास वर्षभरापासून या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माहितीच्या अधिकारात इंडियन एक्स्प्रेसनं मिळवलेल्या माहितीनुसार, या योजनेतील पुरुष लाभार्थ्यांनी प्रतिमहिना १५०० रुपयांप्रमाणे १२ हजार ४३१ पुरुषांनी मिळून सुमारे २४.२४ कोटी रुपयांचा अपहार केला आहे. याशिवाय, विविध कारणास्तव अपात्र ठरलेल्या ७७ हजार ९८० महिला लाभार्थ्यांनीही सुमारे १४०.२८ कोटी रुपये वर्षभर लाटले. यामुळे राज्याच्या तिजोरीला एकूण १६४ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
महिला व बालकल्याण विभागाने कारवाई म्हणून या अपात्र पुरुष व महिला लाभार्थ्यांना योजनेच्या यादीतून वगळले आहे. मात्र, वर्षभर लाटलेल्या या पैशांच्या वसुलीसंदर्भात अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा पाऊले उचलली गेली नसल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी सरकारी कर्मचारी महिलांचा समावेश आणि २४०० पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे उघड झाले होते. सध्या राज्यात २.४१ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीच्या पडताळणीत २६ लाख ३४ हजार संशयित लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले होते, तर ई-केवायसीमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या मोठ्या फसवणुकीची चौकशी सुरू असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.





