Pune district : खानापूर-खेडशिवापूर गटात मोठा भूकंप?

पानशेत : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागताच, खानापूर खेडशिवापूर गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या गटातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पक्षाचे प्रत्येकी एक असे दोन मोठे आणि महत्त्वाचे नेते लवकरच पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या जोरदार तयारीत असल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय स्थानिक सूत्रांनी दिली आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे गटातील आगामी निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
’तो’ बडा नेता कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खानापूर-खेडशिवापूर गटातील एक वजनदार आणि प्रभावी नेता पक्षातील अंतर्गत वाद आणि दुर्लक्षामुळे नाराज आहे. तर, शिवसेनेतील देखील एक महत्त्वाचा पदाधिकारी दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात असून, त्याने पक्षप्रवेशाची अंतिम बोलणी पूर्ण केल्याचे समजते.
चर्चेला उधाण
या दोन्ही नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे संपूर्ण गटातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ‘जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय भूकंप झाल्यास, कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका बसेल?’ आणि ‘हे नेते नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार?’ याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मतदारसंघावर परिणाम
या दोन बड्या नेत्यांचा मोठा जनाधार असल्याने, त्यांच्या पक्षांतराचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर होणार आहे. दोन्ही पक्षांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या चर्चेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पक्षांतराचा हा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.





