Pune District : मध्यरात्री मोठा अनर्थ टळला! मुलींच्या वसतिगृहात गॅस गळती, नेमकं काय घडलं?
Pune District : त्यानंतर संबंधित लोकांना बोलावून गॅस गळती रोखण्यात आली. यामध्ये दीड ते दोन तास गेले.

वाघोली : जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये मंगळवारी मध्यरात्री गॅस गळती झाल्याचा गंभीर प्रकार घडला. सुदैवाने आग लागली नाही. पाणी पिण्यासाठी बाहेर आलेल्या मुलीच्या लक्षात आल्याने तिने आरडा ओरडा केला. यानंतर सर्व मुलींना बाहेर काढून गॅस गळती बंद करण्यात आली.
कॉलेजच्या संकुलात योको स्टेज नावाने हे वसतिगृह आहे. ३२० मुलींची क्षमता असलेल्या या वसतिगृहात १७० मुली येथे राहतात. मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एक मुलगी पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये पाणी पिण्यासाठी आली. तिला गॅसचा वास आला. तसेच सगळीकडे गॅस पसरलेला दिसला. हा प्रकार बघून ती घाबरली. तिने आरडा ओरडा केला.
यानंतर बाकी मुली व वसतिगृहातील महिला खाली आल्या. यानंतर सर्व मुलींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संबंधित लोकांना बोलावून गॅस गळती रोखण्यात आली. यामध्ये दीड ते दोन तास गेले. तो पर्यंत भर रात्री मुली वसतिगृहा बाहेरच होत्या. गॅस गळती रोखून गळती झालेला गॅस बाहेर गेल्यानंतर मुलींना वसतिगृहात सोडण्यात आले. सुदैवाने कोणतीही आग लागली नाही. अन्यथा अनर्थ घडला असता. वसतिगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत.
वसतिगृहाबाबत अनेक तक्रारी तरी उपाययोजना काहीच नाही ?
त्या इमारती जवळ उंदीर, साप व अन्य अनेक प्राणी निघतात. याबाबत मुलींनी अनेक वेळा तक्रार केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे मुलींनी सांगितले. वसतिगृहाचे भरमसाठ शुल्क घेतले जाते. मात्र सुविधा व्यवस्थित पुरविल्या जात नसल्याच्या ही तक्रार मुलींनी केल्या. गॅस टंचाईच्या नावाखाली मेस मध्ये मुलींना केवळ एक भाजी जेवणात दिली जात होती. तसेच काहीवेळा पाण्यामुळेही अनेक मुलींना पोटदुखी व जुलाबाचा त्रास झाल्याचेही पालकांनी सांगितले. याबाबत रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर डी खराडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मंगळवारी रात्री गॅस गळतीचा गंभीर प्रकार घडला. सुदैवाने आग लागली नाही. वसतिगृहासाठी भरमसाठ शुल्क घेतले जाते. मात्र तशा सुविधा पुरविल्या जात नाही. मुलींनी केलेल्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
एक पालक
गॅस गळतीचा प्रकार मंगळवारी रात्री १ वाजता घडला. सर्व मुलींना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षारक्षक व कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना बोलावून गॅस गळती बंद करण्यात आली. त्यानंतर मुलींना पुन्हा वसतिगृहात पाठविण्यात आले.
वसतिगृह काळजीवाहक महिला





