TOP 15 News: SIRबाबत मोठा निर्णय ते केवळ २५ रुपये लिटर इंधनावर धावणार कार; गडकरींची माहिती, जाणून घ्या TOP 15 News
TOP 15 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोड...

TOP 15 News: 1. SIRबाबत मोठा निर्णय! मतदारांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्रे जमा करणार
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने शनिवारी झालेल्या बैठकीत SIR प्रक्रियेअंतर्गत नाव नोंदवणे, दुरुस्ती करणे तसेच दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत वाढवली आहे.
जुळणी न झालेले मतदार किंवा तार्किक विसंगती या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन BLO आवश्यक कागदपत्रे जमा करतील. बीएलओ यांच्याकडून कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल.
2. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मदतीचा हात
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावर ‘शिवसेना शेतकरी मदत केंद्र’ उभे करणार आहे. पीक विमा, कर्जमाफी, शासकीय मदत आणि विविध योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही मदत केंद्रे काम करणार आहेत.
28 सप्टेंबरला अमरावतीतून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते याची सुरुवात होणार आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध सवलती आणि मदतीच्या उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता असते. मात्र, या योजनांचा लाभ घेताना कागदपत्रं, ऑनलाइन अर्ज आणि विमा दाव्यांच्या प्रक्रियेत अनेकदा शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरकारी मदतीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मदत केंद्रांच्या माध्यमातून केली जाणार आहे.
3. राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. विदर्भातील पावसाचा जोर आज आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत विदर्भातील काही भागांत पावसाची नोंद झाली होती. मात्र कमी दाब क्षेत्राचा प्रभाव कमी होत असल्याने आता पावसाचे प्रमाण हळूहळू घटणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील उर्वरित भागात आज ढगाळ वातावरण आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. मात्र पावसाचा जोर कमी होताच कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
4. छगन भुजबळांची कलिना भूखंड प्रकरणात निर्दोष मुक्तता
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील जमिनीवर केंद्रीय ग्रंथालय बांधण्याच्या कंत्राटात गैरव्यवहार आणि लाचखोरी झाल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई विशेष न्यायालयाने कलिना जमीन घोटाळा प्रकरणात भुजबळ आणि अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. २००९ मध्ये छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना कलिना येथील ४ एकर जागेवर ग्रंथालय उभारणीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.
मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या व्यवहारात नियमांचे उल्लंघन करून एका खासगी विकासकाला फायदा पोहोचवला आणि यातून ७९.२ कोटी रुपयांचे नुकसान राज्य सरकारच्या तिजोरीचे झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता न्यायालयाने भुजबळ यांनी कर्मचाऱ्यांना प्रकल्पाच्या आकड्यांमध्ये फेरफार करण्यास, निविदा नियमांमध्ये बदल करण्यास सांगितल्याचे कोणताही पुरावा नाही, असा निष्कर्ष काढला.
5. पुण्यात डीजेच्या दणदणाटानंतर विद्यानंद बापट यांचा प्रशासनावर निशाणा
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेश मंडळांकडून मोठ्या आवाजात, किळसवाणे हावभाव करत गाणी वाजवण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित असतानाही हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सण-उत्सव संपल्यानंतरही पुण्यातील पेठ भागात ध्वनीप्रदूषणाचा त्रास कायम असल्याचा दावा विद्यानंद बापट यांनी केलाय. रात्रीची कटकट काही प्रमाणात कमी झाली असली तरी दणदणाट पूर्णपणे थांबलेला नाही, असं बापट म्हणाले. डेसिबलच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास स्पॉटवरच कारवाई व्हायला हवी होती, मात्र परवानगी देण्यात आल्यानेच नियमभंगाला प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
6. सत्कार करण्यापेक्षा त्याच पैशातून गरजू शेतकरी कुटुंबाला मदत करा – पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात करण्यात आली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या दोन दिवसीय बीड दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी परळीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा उल्लेख करत ‘विकसित भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण भारत’ घडवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचे सांगितले. तसेच आज शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. मात्र अशा कार्यक्रमांमध्ये हार-तुरे आणि सत्कारावर खर्च करण्याऐवजी तोच पैसा गरजू शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरला तर अधिक उपयोगी ठरेल, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी नागरिकांना केलं.
7. मॅगीमध्ये आळ्या… मुदत वैध असतानाही धक्कादायक प्रकार उघड
कल्याणमध्ये मॅगी बनवत असताना त्यामध्ये आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅगी शिजवत असताना आळ्या दिसून आल्याने ती खाण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला आणि संभाव्य अनर्थ टळला. विशेष म्हणजे मॅगीच्या पॅकेटवर फेब्रुवारी २०२७ पर्यंतची मुदत नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुदत वैध असतानाही मॅगीमध्ये आळ्या आढळल्याने खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पॅकेज्ड खाद्यपदार्थामध्ये अशा प्रकारे आळ्या आढळल्याने ग्राहकांच्या अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून विविध खाद्यपदार्थांवर कारवाई सुरू असताना, मोठ्या ब्रँडच्या उत्पादनाबाबत हा प्रकार समोर आला आहे.
8. एसटी प्रवाशांसाठी 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीचे
येत्या 1 ऑक्टोबरपासून एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. सरकारने एसटीच्या प्रवासी भाड्यात महिलांसाठी 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. पण एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड बंधनकारक केल्यानंतर महिला प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. वर्षभरातून एखाद्या-दुसऱ्या वेळेस एटीतून प्रवास करणाऱ्या महिलांनाही आता कार्ड काढावे लागणार आहे.
एसटी प्रवासात सवलत घेण्यासाठी स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे. दरम्यान, यापूर्वी 1 सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
9. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरणार? जयकुमार गोरेंचा इशारा
सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. यासोबतच आचारसंहितेच्या काळात झालेल्या भरती आणि बढत्यांवरही त्यांनी आक्षेप घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केलीय.
10. गडचिरोलीत पावसाचा धुमाकूळ! पर्लकोटा नदीला महापूर
महाराष्ट्राच्या काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असतानाच गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आला असून, अतिदुर्गम भामरागड शहराला पर्लकोटा नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे.
पर्लकोटा नदीने रौद्ररूप धारण केल्याने नदीचे पाणी वेगाने वाढले आणि त्याचा थेट परिणाम भामरागड शहरावर झाला. पुराच्या पाण्यामुळे भामरागडचा इतर भागांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या भामरागडमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र यंदा पर्लकोटा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे चित्र आहे.
11. ‘इंडिया’ आघाडीची 30 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत बैठक
निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची ३० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. संविधान क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीत निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी या बैठकीची माहिती दिली.
हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झालेल्या सभेत त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संदेश पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. ममता यांनी राहुल गांधी तसेच माकपचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांच्याशीही फोनवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.
12. केवळ २५ रुपये लिटर इंधनावर धावणार कार; नितीन गडकरींचा दावा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात ऑक्टोबर महिन्यात पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार बाजारात आणली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या कारसाठी पेट्रोलची अजिबात गरज भासणार नाही. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या कारच्या वापराचा खर्च जवळपास २५ रुपये प्रतिलिटर पेट्रोलच्या दराने कार चालवण्याइतका असेल, असं सांगितलं.
गडकरी यांना ऑक्टोबरमध्ये टोयोटाच्या ‘इनोव्हा फ्लेक्स-फ्यूल’ कारच्या लाँचिंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही कार १०० टक्के इथेनॉलवर धावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यांनी असा दावा केला की, ही कार धावताना ६० टक्के वीजही निर्माण करेल. यामुळे वाहनचालकांना इंधनाचा एक स्वस्त आणि पर्यावरणास पूरक पर्याय उपलब्ध होईल.
13. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा ‘ट्रम्प स्ट्रेट’ उल्लेख
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा उल्लेख ‘ट्रम्प स्ट्रेट’ असा केला आहे. ‘ट्रुथ सोशल’या आपल्या समाजमाध्यमावर त्यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा प्रसिद्ध केला असून ज्यात हा उल्लेख करण्यात आला आहे. इराणने अमेरिकन नाकेबंदी उठवणे, इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंध शिथिल करणे आणि लेबनानसह युद्धबंदी लागू करणे या अटींवर हा मार्ग खुला करण्याची तयारी दर्शवली होती. या प्रस्तावावर अमेरिकन मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. दरम्यान, इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांचा निषेध करत चर्चेचे मार्ग खुले ठेवले आहेत.
14. निवृत्तीच्या चर्चांवर हिटमॅनचा थेट प्रहार, रोहित शर्माने ठणकावून सांगितले…
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. स्वतः रोहित शर्माने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत आपली भूमिका उघड करत, मैदानातून इतक्यात पायउतार होण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले आहे.
रोहित शर्मा म्हणाला, “माझ्या मनात कधीच असा विचार येत नाही की, जे काही मिळवायचे होते ते मिळवून झाले आहे. जोपर्यंत तुम्ही खेळत आहात, तोपर्यंत भविष्यात साध्य करण्यासाठी नेहमीच नवे लक्ष्य असते. मी आगामी विश्वचषकाकडे आणि त्यातील संधींकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहत आहे.” जागतिक स्तरावर विविध प्रतिस्पर्धी आणि भिन्न मैदानांवर स्वतःला सिद्ध करणे हेच खेळाडूसाठी खरे आव्हान असते, असेही त्याने नमूद केले.
15. ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल
‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिच्यासह तिच्या साथीदारांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याचा आणि ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
एफआयआरनुसार, दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे आणि काही जणांनी डॉ. गायकवाड यांच्या घरी जाऊन पैसे मागितले. त्यानंतर गुरुवारी रात्री घरात घुसून काठी, बेल्ट आणि तांब्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. घरातील वस्तूंची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. जखमी डॉ. गायकवाड यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिव्या शिंदेच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून प्रकरण खोटे असल्याचा दावा केला आहे.
Pimpri News: पिंपरीत नऊ तासांचा जल्लोष; २७ मंडळांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप









