Pimpri News: पिंपरीत नऊ तासांचा जल्लोष; २७ मंडळांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
Pimpri News ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रथ आणि आतषबाजीत रंगली विसर्जन मिरवणूक

पिंपरी – नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फुलांनी सजविलेले आकर्षक रथ, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पिंपरीतील गणेशभक्तांनी शुक्रवारी (दि. २५) लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पिंपरीतील कराची चौकातून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल नऊ तास रंगली. या कालावधीत २७ गणेश मंडळांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
पिंपरीतील कराची चौकातून दुपारी तीन वाजता नवचैतन्य मित्र मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर विविध मंडळांच्या मिरवणुका टप्प्याटप्प्याने घाटाच्या दिशेने रवाना झाल्या. रात्री बारा वाजता अष्टविनायक मित्र मंडळाच्या गणरायाच्या विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.
इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, कराची चौकमार्गे झुलेलाल घाट आणि वैभवनगर घाट या मार्गावरून मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. कराची चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येथे महापालिका मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
सायंकाळी सिद्धीविनायक मित्र मंडळ, कैलास तरुण मित्र मंडळ आणि विक्रांत भाट मित्र मंडळांच्या मिरवणुका घाटाकडे मार्गस्थ झाल्या. त्यानंतर साई मित्र मंडळ, मोरया प्रतिष्ठान, शिवशक्ती तरुण मंडळ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला.
रात्री उशिरापर्यंत फूल मार्केटचा राजा मंडळ, सावित्रीबाई फुले भाजी मंडई गणेश मंडळ, साई तरुण मित्र मंडळ.
न्यू स्टार मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, भागवत तरुण मंडळ, जयभारत तरुण मंडळ यांसह विविध मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. रात्री बारा वाजता पोलिसांनी ढोल-ताशा, डीजे आणि बॅण्डचा आवाज बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर उर्वरित मंडळांनी वाद्यांविना मिरवणूक पुढे नेत थेट विसर्जन घाट गाठला आणि बाप्पाला निरोप दिला.
आकर्षक रथांनी वेधले लक्ष
मिरवणुकीत विविध मंडळांनी सजविलेले आकर्षक रथ नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. बालाजी आणि श्रीकृष्णाच्या प्रतिमा साकारून केलेली सजावट विशेष लक्षवेधी ठरली. पारंपरिक खेळ, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने कराची चौक परिसर दुमदुमून गेला.
लयबद्ध ढोल-लेझीमने रंगत वाढविली
लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या गणरायाचे नेत्रदीपक रथातून आगमन झाले. अशोक ढोल-लेझीम पथकाच्या लयबद्ध वादनावर कलाकारांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. त्यामुळे कराची चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिवशक्ती तरुण मंडळ, ओम साईराम मित्र मंडळ आणि फूल मार्केटचा राजा मंडळाच्या मिरवणुकीतील पथकांनीही पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादरीकरण केले.
डीजेपेक्षा ढोल-ताशांना पसंती
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटापेक्षा पारंपरिक ढोल-ताशा आणि बॅण्ड पथकांना अनेक मंडळांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांच्या ध्वनिप्रदूषणविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे भान ठेवले.
ढोल-ताशांच्या तालबद्ध सादरीकरणामुळे मिरवणुकीला पारंपरिक आणि सांस्कृतिक रंग लाभला. पारंपरिक कलेला प्रोत्साहन देतानाच ध्वनिप्रदूषण टाळण्याचा संदेशही अनेक मंडळांनी दिला.
Pimpri-Chinchwad: गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडमधून लाखो नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास





