Ladakh : लडाखमध्ये स्टंटबाजांना मोठा दणका.! ‘ऑफ-रोडिंग’ करणाऱ्या पर्यटकांना २ लाखांचा दंड
लडाख प्रशासनाने पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि संरक्षित क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर 'ऑफ-रोडिंग' करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध पहिल्यांदाच मोठी आणि कठोर कारवाई केली आहे.

Ladakh – लडाख प्रशासनाने पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि संरक्षित क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर ‘ऑफ-रोडिंग’ करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध पहिल्यांदाच मोठी आणि कठोर कारवाई केली आहे.
वन्यजीव (संरक्षण) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वेगवेगळ्या राज्यांतील पर्यटकांवर एकूण दोन लाख रुपयांचा (प्रत्येकी ५० हजार रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.
पँगोंग तलाव आणि इतर संरक्षित वन्यजीव अधिवासांचे होणारे पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियम मोडणाऱ्या या वाहनमालकांचा संबंध हिमाचल प्रदेश, चंदीगड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांशी आहे.
गेल्या काही दिवसांत त्यांनी आपली वाहने पँगोंग तलाव, चांगथांग आणि नुब्रा येथील संरक्षित वन्यजीव क्षेत्रांमध्ये बेकायदेशीरपणे नेली होती.
सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि नियमित गस्तीदरम्यान वन्यजीव अधिकाऱ्यांना ही उल्लंघने आढळून आली होती. सखोल तपासानंतर ही चारही वाहने जप्त करण्यात आली होती आणि दंड भरल्यानंतरच ती सोडण्यात आली.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी पर्यटकांना लडाखमध्ये जबाबदार आणि पर्यावरण-जागरूक पर्यटनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
लडाख पर्यटकांचे मनापासून स्वागत करत असले, तरी संरक्षित वन्यजीव अधिवासांमध्ये बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, संरक्षित क्षेत्रांच्या आत ‘ऑफ-रोड’ गाडी चालवणे हा ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२’ अन्वये गंभीर गुन्हा असून, अशा उल्लंघन कर्त्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा उपराज्यपालांनी दिला आहे.
कारवाई झालेल्या प्रमुख घटना :
२३ जून : ‘मेराक’ जवळ पँगोंग सरोवराच्या पाण्यात पंजाब क्रमांकाची ‘महिंद्रा थार’ गाडी केवळ स्टंट करण्यासाठी मुद्दाम नेण्यात आली, ज्यामुळे सरोवरामध्ये प्रदूषण झाले.
२१ जून : चांगथांग वन्यजीव अभयारण्यातील पँगोंग सरोवराकाठी उत्तर प्रदेश क्रमांकाची ‘ह्युंदाई क्रेटा’ ऑफ-रोड चालवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ती जप्त करण्यात आली.
२० जून : काराकोरम अभयारण्याच्या आत एका ओढ्यातून पंजाब क्रमांकाची ‘महिंद्रा थार’ चालवून पर्यावरणीय अखंडतेचे नुकसान करण्यात आले.
१७ जून : चांगथांग अभयारण्यातील ‘नुरबू ला’ जवळ हिमाचल प्रदेश क्रमांकाच्या ‘टोयोटा फॉर्च्युनर’ चालकाने एका ‘तिबेटीयन गझेल’ (हरणासारखा प्राणी) चा पाठलाग केल्याचे व्हिडिओत समोर आले.





