Chimbli Tree plantation : चिंबळीत 200 देशी वृक्षांचे रोपण; ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजनेची घोषणा
Chimbli Tree plantation : चिंबळी येथे राजगुरू जयंती व पी. टी. शिंदे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजना राबविण्याची घोषणा.

Chimbli Tree plantation : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती आणि ‘रानमळा पॅटर्न’चे प्रणेते निसर्गवासी पी. टी. शिंदे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका आणि नेचर फाउंडेशन, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २४) माजगाव, चिंबळी (ता. खेड) येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी २०० देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली.
चाकण-आळंदी वनपरिक्षेत्रातील माजगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, वराळे सी.आय.ई. इंडिया गेअर्स डिव्हिजनचे उमेश ठाकरे, उपसरपंच राहुल चव्हाण, उद्योजक सुमित जाधव, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अशोक येळवंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत बोरावके, सहखजिनदार सुनील बटवाल, प्रसिद्धी प्रमुख अनिल जोगदंड, चाकण वनविभाग नियतक्षेत्र अधिकारी अचल गवळी, नवनाथ पगडे, वनसेवक किसन पारधी, माणिक वाळके, बाबासाहेब भंडारे आदी उपस्थित होते.
यावेळी हनुमंत देवकर यांनी मानवी जीवनात वृक्षांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची झालेली गैरसोय आणि त्यावेळी मानवाला वृक्ष व ऑक्सिजनचे जाणवलेले महत्त्व त्यांनी नमूद केले. वृक्षारोपण हा केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता तो सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी देवकर यांनी पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या ‘स्मृतीवृक्ष’ उपक्रमाचीही माहिती दिली. प्रिय व्यक्तींच्या अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाड लावून त्याच्या खाली अस्थी विसर्जित करणे आणि ते झाड आयुष्यभर जपणे, असा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देताना आगामी काळात तालुक्यात ‘रानमळा पॅटर्न’अंतर्गत ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजना राबविणार असल्याची घोषणा केली. तसेच ‘आनंद झाड’ आणि ‘स्मृतीवृक्ष’ या उपक्रमांची माहिती दिली.
विलास कातोरे यांनी माजगाव परिसरातील वनविभागाच्या कामाचा उल्लेख करत वृक्षलागवड आणि संगोपनामुळे परिसर हिरवागार झाला असून वन्यजीवांना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अधिवास मिळाल्याचे सांगितले. त्यांनी पी. टी. शिंदे गुरुजी यांच्या कार्याच्या आठवणींनाही उजाळा दिला.
उपसरपंच राहुल चव्हाण यांनी वृक्षसंवर्धनासाठी चिंबळी ग्रामस्थांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वृक्षारोपणविषयक दूरदृष्टीचा उल्लेख केला. सरकारने कर्जमाफी देताना प्रत्येक एकरात १२ वृक्षांची लागवड व संवर्धन सक्तीचे करण्याचे धोरण राबवावे, अशी मागणी त्यांनी केली.





