Nashik : साईभक्त मुक्कामाच्या ठिकाणी थांबताच घडली मोठी दुर्घटना; १७ जण जखमी
जखमी सर्व साईभक्त हे शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील रहिवासी असल्याची माहिती

Nashik : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील ‘साई निवारा’ येथे रात्रीच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या साईभक्तांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अचानक निवारा शेड कोसळल्याची घटना घडली.
या दुर्घटनेत तब्बल १७ साईभक्त जखमी झाले असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. जखमी झालेले सर्व साईभक्त हे शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील रहिवासी आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी पालखी घेऊन सर्व शिर्डीच्या दिशेने रवाना झाले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या या दुर्घटनेत निवाऱ्याच्या स्लॅबचे गर्डर आणि लोखंडी-सिमेंटच्या फरशा थेट खाली अंगावर कोसळल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच तारांबळ उडाली आणि मोठा आवाज झाल्याने भीतीचे वातावरण पसरले. घटना समजताच स्थानिक नगरसेवक राज जावरे, पोलीस यंत्रणा आणि महामार्ग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
10 जखमींची प्रकृती स्थिर
मदतीसाठी पुढे येत या सर्वांनी मिळून जखमी साई भक्तांना तातडीने इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत एकूण १७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन भक्तांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
तर तीन जणांना फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित 10 जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा:




