Nimmi Property Fraud Case: दिवंगत अभिनेत्री निम्मी यांच्या संपत्तीवर केअरटेकरचा डोळा! १.८ कोटींची एफडी हडपल्याचा आरोप, मुंबईतून अटक
Nimmi Property Fraud Case मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असरार इक्बाल शेख याला अटक केली. मंगळवारी रात्री दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील निवासस्थानातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Nimmi Property Fraud Case: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री निम्मी यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीशी संबंधित फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीच्या जुन्या केअरटेकरने बनावट स्वाक्षरी करून तब्बल १.८ कोटी रुपयांची फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मोडल्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवरही डल्ला मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ६२ वर्षीय केअरटेकर असरार इक्बाल शेख याला अटक केली आहे.
बनावट स्वाक्षरी करून १.८ कोटी रुपये हडपल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असरार इक्बाल शेख याला अटक केली. मंगळवारी रात्री दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील निवासस्थानातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने अभिनेत्री निम्मी यांच्या नावावर बँकेत जमा असलेली जवळपास १.८ कोटी रुपयांची फिक्स्ड डिपॉझिट मुदतीपूर्वीच मोडली. त्यासाठी बनावट स्वाक्षरीचा वापर केल्याचा आरोप आहे. एफडीमधून मिळालेली संपूर्ण रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यात वळवली, असा पोलिसांचा संशय आहे.
याशिवाय अभिनेत्रीचे सोन्याचे दागिनेही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या नावावरील एफडी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मोडण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळ्या बँकांमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर संपत्तीचा वाद सुरू
या संपूर्ण प्रकरणामागे अभिनेत्री निम्मी यांच्या संपत्तीचा वारसा असल्याचे सांगितले जात आहे. निम्मी यांनी निधनाच्या काही महिन्यांपूर्वी आपली सर्व चल आणि अचल संपत्ती अली सय्यद परवेझ यांच्या नावावर केली होती. परवेझ यांना त्या स्वतःच्या मुलाप्रमाणे मानत होत्या. परवेझ हे आपल्या कुटुंबासह ब्रिटनमध्ये राहत होते. मात्र, डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे निधन झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, परवेझ यांच्या निधनानंतर आरोपी केअरटेकरने या संपत्तीवर डोळा ठेवला. संपत्तीचा वारसदार नसल्याचा फायदा घेऊन त्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत पाच वेगवेगळ्या टप्प्यांत एफडीमधील पैसे स्वतःच्या खात्यात वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
७ कोटींच्या दोन फ्लॅटवरही होती नजर
निम्मी यांच्या संपत्तीमध्ये मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम परिसरातील जुहू तारा रोडवरील नेहा अपार्टमेंटमधील दोन आलिशान फ्लॅटचाही समावेश आहे. या दोन्ही फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ जवळपास १,४०० चौरस फूट असून त्यांची सध्याची बाजारभावानुसार किंमत सात कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.
आरोपी केअरटेकरला हे फ्लॅट विकायचे होते. त्यासाठी त्याने गेल्या वर्षी अभिनेत्रीच्या पुतण्याशी, मोहम्मद युनूस दुरानी यांच्याशी संपर्क साधला. फ्लॅट विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधील काही हिस्सा देण्याचे आमिषही त्याने दाखवले.
दरम्यान, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या परवेझ यांच्या पत्नीने कायदेशीर प्रक्रियेसाठी दुरानी यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. मात्र, केअरटेकरने फ्लॅट विक्रीसाठी दिलेल्या प्रस्तावामुळे दुरानी यांना संशय आला. त्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने या दोन्ही फ्लॅटच्या विक्रीवर स्थगिती दिली.
बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का?
सध्या मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरीच्या आधारे एवढी मोठी रक्कम बँकेतून कशी काढण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. तसेच हडप केलेली १.८ कोटी रुपयांची रक्कम आणि गायब झालेले सोन्याचे दागिने नेमके कुठे आहेत, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती, हेही तपासानंतर स्पष्ट होणार आहे.





