Mahmoud Abbas : पॅलेस्टाईनच्या नवीन सरकारमध्ये हमास नसेल; पॅलेस्टाईनचे अधयक्ष महमूद अब्बास यांची ग्वाही

संयुक्त राष्ट्रे : गाझामधील युद्ध समाप्त झाल्यानंतर तेथील नवीन सरकारमध्ये हमासची काहीही भूमिका नसेल, अशी ग्वाही पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये दूरदृश्य माध्यमातून बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले. अमेरिकेने अब्बास यांचा व्हिसा रद्द केल्यामुळे त्यांना महासभेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नाही.
इस्रायलवर २०२३ साली हमासने केलेल्या हल्ल्याचा पॅलेस्टिनी निषेध करत आहेत. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात हमासला शस्त्रे खाली ठेवावीच लागतील. युद्धानंतरच्या सरकारमध्ये हमासची काहीही भूमिका नसेल, असे ते म्हणाले. गाझामधील पॅलेस्टिनी सध्या नरसंहार, विद्ध्वंस, उपासमार आणि विस्थापनाला सामोरे जात आहेत. पण हमास पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधीत्व करत नाही.
त्यामुळे गाझामध्ये युद्धपश्चात नवीन सरकार स्थापन करण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारायला पॅलेस्टिनीयन ऍतोरिटी पूर्ण तयार आहे, असेही अब्बास म्हणाले. नवीन सरकारमध्ये हमास असणार नाही. हमासला आपली शस्त्रे पॅलेस्टिनी ऍतोरिटीकडेच सोपवावी लागतील. पॅलेस्टिनींना मुक्त केले गेले नाही, तर न्याय होणार नाही, असे सांगून गाझामधील पॅलेस्टिनींच्या हितासाठी उभे राहणाऱ्या जागतिक नेत्यांचे त्यांनी आभारही मानले.





