Mahima Chaudhry: ‘माझ्या चेहऱ्यात काचांचे ६७ तुकडे घुसले होते…’; भीषण अपघाताचा अनुभव सांगताना भावूक झाली महिमा चौधरी

Mahima Chaudhry : १९९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी यांनी नुकताच त्यांच्या आयुष्यातील एका भीषण अपघाताचा अनुभव सांगितला आहे. या अपघातामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता, असं त्यांनी सांगितलं. अजय देवगनसोबत काम करत असताना हा अपघात झाला होता आणि त्यात त्यांच्या चेहऱ्यात काचांचे तब्बल ६७ सूक्ष्म तुकडे घुसले होते.
महिमा चौधरी यांनी शाहरुख खानसोबतच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या. मात्र यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. काम मिळणं बंद झालं, कायदेशीर प्रकरणं, भीषण अपघात, आजारपण आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष असा कठीण काळ त्यांनी पाहिला.
शूटिंगदरम्यान झाला होता अपघात
अलीकडेच सिद्धार्थ कनन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना महिमाने हा प्रसंग आठवला. १९९९ साली अजय देवगनसोबतच्या ‘दिल क्या करे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात कारची काच फुटली आणि तिचे बारीक तुकडे महिमाच्या चेहऱ्यात घुसले.
डॉक्टरांनी मायक्रोस्कोपच्या मदतीने एक-एक काच काढली होती. या सर्जरीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर खूप सूज आली होती आणि चेहऱ्याचा आकारही बदलल्यासारखा वाटत होता.
View this post on Instagram
तो काळ खूप कठीण होता
महिमाने सांगितलं की या अपघातानंतर त्या जवळपास एक वर्ष घरी बसून होत्या. काही लोकांना वाटत होतं की त्यांचा कुणाशी तरी भांडण झालं आहे. काही मित्र या परिस्थितीवर हसलेही. त्या काळात पुढे काय होणार, करिअर टिकेल का, असा प्रश्न त्यांना सतावत होता.
लवकरच नव्या चित्रपटात दिसणार
सध्या महिमा चौधरी त्यांच्या आगामी ‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात त्यांच्यासोबत संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
महिमाचा हा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

