Maheshwari Football League : रॉयल्स, स्पार्टन्सची विजयी सलामी…

पुणे – पी. पी. रॉयल्स आणि आर. आर. स्पार्टन्स संघाने महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल माॅल मधील फुटबाॅल ग्राऊंड येथे ही स्पर्धा सुरू आहे.
पहिल्या लढतीत रॉयल्स संघाने एमजेएम ग्लॅडिएटर्स संघावर ४-० ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. रॉयल्सच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. लढतीच्या अकराव्या मिनिटाला सर्वेश कारवाने गोल करून रॉयल्स संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर लढतीच्या १९व्या मिनिटाला नवल मालपाणीने गोल करून रॉयल्सची आघाडी २-०ने वाढवली. श्रावण राठीने (२१, २५ मि.) एकापाठोपाठ दोन गोल करून रॉयल्सला ४-० ने विजय मिळवून दिला.
दुसऱ्या लढतीत स्पार्टन्स संघाने दुबई एक्स्पर्ट डायनामोज संघावर ४-१ने विजय मिळवला. लढतीच्या दुसऱ्याच मिनिटाला अंकित मुंदडाने गोल करून स्पार्ट्न्स संघाला आघाडी मिळवून दिली. स्पार्टन्सने ४-१ अशी आघाडी अखेरपर्यंत कायम राखून बाजी मारली. तिसऱ्या लढतीत अक्षत मुंदडा (११ मि.) आणि स्वराज नवंदरच्या (१६ मि.) गोलच्या जोरावर श्री गणेश वॉरिअर्स संघाने एनपीएव्ही निन्जास संघावर २-०ने मात केली.





