Mahesh Shinde : महेश शिंदे मतदारसंघ बदलणार? अखेर आमदार शिंदेंनीच केला मोठा खुलासा, म्हणाले..

प्रभात वृत्तसेवा
कृष्णानगर – आधीचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आणि आताचा मतदारसंघ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा राहिला आहे. जिहे-कठापूर योजनेतून कित्येक गावे ओलिताखाली आणली आहेत. मात्र, आमच्या विकासकामांमुळे विरोधकांना पोटशूळ उठत आहे. त्यांना सध्या आमच्यावर टीका करण्याखेरीज काही काम उरले नाही. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत मी मतदारसंघ बदलणार असल्याची अफवा पसरवली जात आहे, अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा वाढे फाटा येथे नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला डॉ. सौ. प्रिया शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, खेड, वाढे, बोरखळ, शिवथर, मालगाव, गोजेगाव, अंगापूर, चिंचणेर, क्षेत्र माहुली, आरळे, खिंडवाडी, कारंडवाडी, धनगरवाडी, देगाव, निगडी, देवकरवाडी, महागाव येथील कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे म्हणाले, मतदारसंघातील गोजेगाव, समर्थनगर, संभाजीनगर, चिंचणेर या गावांमध्ये आपण प्रत्येक घरापर्यंत काँक्रिटीकरण केले आहे. मागणीपेक्षा जास्त कामे फक्त अडीच वर्षांत पूर्ण केली आहेत. पुढील अडीच वर्षांत जास्तीत जास्त निधी मंजूर करून मतदारसंघातील कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी मतदारसंघ बदलणार असल्याची अफवा पसरवून, विरोधक मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, माझ्याबरोबर प्रामाणिक व कष्टाळू कार्यकर्ते आहेत. चांगल्या माणसांचा व सर्वसामान्यांचा पक्ष आहे.
त्यामुळे मला पराभवाची भीती नाही. येत्या काही दिवसात मतदारसंघात मेळावा घेऊन पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे.संदीप शिंदे म्हणाले, आधीच्या लोकप्रतिनिधींनी भकास केलेल्या मतदारसंघाचा विकास आमदार महेश शिंदे यांनी केला. विकासकामांच्या नावावर भ्रष्टाचार केलेले उमेदवार आमच्याबद्दल गैरसमज पसरवत आहेत. मात्र, आमचे कार्यकर्ते विचाराने नेटके आहेत. तुम्ही केलेल्या सहकार्यामुळेच आमदार महेश शिंदे यांची विकासपुरुष म्हणून राज्यात ओळख झाली आहे.
जनता सूज्ञ झाल्याने, आता पैशाच्या नव्हे, तर विचारांच्या जोरावर राजकारण होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार प्रयत्नपूर्वक निवडून दिले, तरच विकासकामांचा डोंगर उभा राहील.डा. सौ. प्रिया शिंदे म्हणाल्या, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी पुसेगाव येथे येत्या काही दिवसांत कृत्रिम अवयव शिबिर घेण्यात येणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घ्यावा.
क्षेत्र माहुली येथील कार्यकर्ते राजेंद्र इंगळे आणि कोडोली येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवी भोसले यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या अहोरात्र परिश्रमामुळे मी तुमच्यासमोर आमदार म्हणून उभा आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, असे सांगताना आ. महेश शिंदे भावूक झाले होते.




