Mahendra Thorve : मंत्री देसाईंच्या बैठकीत आमदार थोरवेंची फटकेबाजी ; माथेरानसाठी केल्या ‘या’ मोठ्या मागण्या

प्रभात वृत्तसेवा
माथेरान – मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी (दि. २७) महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली माथेरान पर्यटन विकास व स्थानिक समस्यांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.या बैठकीत कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानच्या पर्यटनविकासासाठी ठोस उपाययोजनांसाठी मागणी केली.
त्यांनी भूखंड क्रमांक ९३ सीएसएसन माथेरान नगरपरिषदेच्या ताब्यात विनामोबदला देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा, तसेच पनवेल ते माथेरान युनिक्युलर रेल्वे प्रकल्पावर एमएमआरडीएने तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी केली.सोबतच ई-रीक्षा सेवेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी, क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे पूर्ण करणे आणि माथेरानसाठी नवीन पर्यावरण संवेदनशील नियंत्रण समिती स्थापन करणे या बाबींबाबतही त्यांनी ठोस सुचना मांडल्या.
या बैठकीत माथेरानसह कर्जत-खालापूर मतदारसंघातील पर्यटनविकासाला गती देण्यासाठी सविस्तर चर्चा होऊन संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले.बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, सुनील शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे व गौरंग वाघेला, जहूर चिपाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमुळे माथेरानच्या पर्यटन विकासाचा आणि स्थानिक सुविधांच्या उन्नतीचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





