Devendra Fadnavis : विधानपरिषदेतील ‘या’ तीन जागांवर महायुतीचे अडलं; फडणवीस म्हणाले, “कठीण पेपर संपला, आता सोपा पेपरही…”
Devendra Fadnavis : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा केवळ दोन ते तीन जागांवर बाकी; फडणविसांची माहिती

Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांच्या एकूण 17 जागांसाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून, केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय बाकी आहे, अशी माहिती फडणवीस यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे.
विधानपरिषदेच्या 17 पैकी 12 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती असून शिंदेंच्या शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षाचे प्रमुख दिल्लीत होते. त्याच अनुषंगाने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीनंतर माहिती दिली. Devendra Fadnavis
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“विधानपरिषद निवडणुकीबाबत आमचं जवळपास अॅग्रीमेंट झालेलं आहे, फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर येथील जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. राष्ट्रवादीने आमच्याकडे पुण्याची जागा मागितली आहे, सध्या याच गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ.
कठीण पेपर संपला, आता सोपा पेपरही आम्ही सोडवून घेऊ, टीकमार्क करायचं बाकी आहे, ते होऊन जाईल. यावर मित्रपक्षांचे नेते एकत्र बसून यावर अत्यंत तोडगा काढतील,” असे फडणवीस यांनी सांगितले.
” तर गृहमंत्री महोदय आमचे नेते आहेत, त्यांच्यासोबत बसून आम्ही चर्चा करत असतो. मात्र, विधानपरिषदेच्या जागेचा प्रश्न मुंबईतच सोडवला जाईल. तसेच विधानपरिषदेत इतक्या आधी गोष्टी होत नाहीत, त्या वेळेवर होतात. जागावाटप असेल किंवा उमेदवारांची नावे असतील. उमेदवारी अर्ज भरतेवेळीच सर्वकाही अंतिम होईल,” असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड जिल्ह्यातील जागांसाठी आग्रही आहे, तर शिंदेंची शिवसेना संभाजीनगरची जागा आपल्याकडेच राहावी, यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय बाकी आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून, तर अर्ज माघारीची शेवटची तारीख 4 जून आहे. मतदान प्रक्रिया 18 जूनला होणार असून मतमोजणी 22 जूनला होणार आहे. Devendra Fadnavis
हेही वाचा :
Bhama Askhed Water : भामा-आसखेडचे पाणी पिवळसर का येतंय? महापालिकेने अखेर केला मोठा खुलासा






