अग्रलेख : महाशक्तीचे स्वबळ…

‘महाराष्ट्रात यावेळी होणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर येईलच; पण त्यानंतर पाच वर्षांनी येणार्या निवडणुकीमध्ये एकट्या भाजपचे सरकार सत्तेवर येईल’, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यामुळे सध्या महायुतीचे घटक पक्ष असलेले विविध पक्ष आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले नसतील तरच नवल.
साधारण अडीच वर्षांपूर्वी जेव्हा एकदाच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करून गुवाहाटी येथे जाऊन संपूर्ण व्यूहरचना केली होती तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व भाषणांमध्ये नेहमीच ‘आपल्यामागे महाशक्ती उभी’ असल्याची घोषणा केली होती. ती महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पक्ष होता. पण आता हीच महाशक्ती महायुतीपेक्षाही स्वतःचे बळ आजमावण्यावर भर देत आहे हे एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने कधीही निवडणुकीत स्वबळ महत्त्वाचे आहे ही आपली महत्त्वाकांक्षा लपवलेली नाही. खूप पूर्वीपासून भाजपने ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा दिला आहे. राजकीय अपरिहार्यतेमधून किंवा काही राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून भारतीय जनता पक्षाने अनेक नवीन मित्र केले असले, तरी नंतर भारतीय जनता पक्षाने नेहमीच ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा देऊन त्या राज्यामध्ये स्वबळावर सत्ता मिळवण्यासच प्राधान्य दिले आहे. याच भूमिकेतून भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील संबंधही ताणले गेले होते आणि ते अखेर तुटले. आता जो अनुभव उद्धव ठाकरे यांना काही वर्षांपूर्वी आला होता तशाच प्रकारचा अनुभव येत्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना येऊ शकतो, असेच संकेत अमित शहा यांच्या या विधानामुळे मिळत आहे.
गेल्या आठवड्यामध्ये नागपूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना अमित शहा यांनी ‘महायुतीला बरोबर घेऊन आपल्याला राज्यात सत्ता मिळवायची आहे’, अशी घोषणा केली होती. पण त्यानंतर आठच दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी ‘2029 मध्ये फक्त भाजपचे सरकार राज्यात असेल’ अशी घोषणा केली आहे. हा बदलही लक्षात घेण्यासारखा आहे. अर्थात यावेळी म्हणजे 2024 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र महायुती एकत्रपणे काम करेल आणि सत्तेवर येईल असे जरी त्यांनी म्हटले असले, तरी आणखी पाच वर्षांनी काय होऊ शकते याची चुणूक मात्र या निमित्ताने त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर मित्र पक्षांच्या नेत्यांना दाखवून दिली आहे. देशातील कोणत्याही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने तेथील प्रादेशिक पक्षाबरोबर जर युती केली असेल, तर काही कालावधीनंतर त्या प्रादेशिक पक्षाचे महत्त्व कमी करून स्वतःचे महत्त्व वाढवून शतप्रतिशत पद्धतीने त्या राज्यामध्ये स्वतःला प्रस्थापित करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने नेहमीच केले आहे.
महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. हा पक्ष एकेकाळी चार नंबरवर असायचा. आता त्या पक्षाने पहिल्या नंबरवर आघाडी घेतली असल्यामुळे स्वबळावर सत्ता मिळवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असणारच आहे. येत्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात कोणत्या राजकीय घडामोडी घडू शकतील याचा कोणताच अंदाज नसतानाही केवळ कार्यकर्त्यांना एक टार्गेट देण्याच्या दृष्टिकोनातूनच अमित शहा यांनी हे विधान केले आहे हेसुद्धा उघड आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात आपला पाया भक्कम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने इतर राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षामध्ये ओढण्याचे काम केले. त्याचा फायदा म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्या होत्या. पण आता गेल्या काही महिन्यांतील घडामोडींवर जर नजर टाकली, तर भारतीय जनता पक्षामध्ये जे इन्कमिंग होत होते ते थांबले आहे, उलट आउटगोइंग वाढले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये वाढ होण्यामध्ये इतर राजकीय पक्षांमधील प्रमुख राजकीय नेत्यांचा सहभाग होता हे राजकीय वास्तव आहे. पण आता इतर राजकीय पक्षांमधील नेते आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी फारसे उत्सुक राहिलेले नाही हे दुसरे वास्तवही या निमित्ताने लक्षात घ्यावे लागणार आहे. त्याबद्दलच्या राजकीय परिस्थितीची जाणीव निश्चितच शहा आणि फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आहे. म्हणूनच यावेळच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सत्ता मिळवत असतानाच त्यापुढच्या निवडणुकीमध्ये फक्त भाजपची सत्ता आणण्याचे टार्गेट त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. अर्थात, 2029 मध्ये होणार्या निवडणुकीनिमित्ताने विनाकारण मित्रपक्षांमध्ये राजकीय घबराट निर्माण करून त्याचे यावेळच्या निवडणुकीवर जर नकारात्मक परिणाम झाले, तर काय होऊ शकते याचाही विचार या नेत्यांनी करायला हवा.
यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्या आणि पुन्हा स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्नही भंगले. ते पाहता कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा केंद्रात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये स्वबळावर सत्ता मिळवण्याचे ध्येय भारतीय जनता पक्षाने बाळगलेले दिसते. अमित शहा यांनी केलेल्या या घोषणेवर अद्याप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादी वेगळी रणनीती आकाराला येऊ लागली असेल. अमित शहा यांच्या या घोषणेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळेल; पण मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थतेची भावना वाढीस लागणार आहे, हे निश्चित.





