Jayant Patil : “महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्याची उंची लहान केली” – जयंत पाटील

Jayant Patil – शिवस्मारकाची जागा आम्ही शोधून काढली आहे. म्हणजे मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. त्याच जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले होते. मात्र ८ वर्षे होउनही अद्याप काहीही झालेले नाही. त्याचे डिझाईन महाराष्ट्र सरकारने बदलले.
जे पूर्वीचे डिझाईन होते ते अतिशय उत्तम आणि टेक्निकली फिट होते. मात्र ते डिझाईन बदलून सरदार पटेल यांच्या पुतळ्य़ापेक्षा शिवरायांचा पुतळा लहान व्हावा, असे काम त्यावेळी महायुती सरकारने केले.
सरदार वल्लभाई पटेल यांच्यापेक्षा देशात कुठलाही पुतळा मोठा होऊ नये, असे त्यांचे ठरले असेल. आमचे सरकार आले की आम्ही यात लक्ष घालू, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रातील पुतळ्याचा मुद्दा संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 2016 रोजी अरबी समुद्रात स्मारकाचे जलपूजन करण्यात आले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे जयंत पाटलांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा उभारायचा होता, तो उभारला नाही, आणि जो उभारला गेला तो पडला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.





