Mahavitaran strike : खासगीकरणाविरोधात महावितरणचे कर्मचारी आक्रमक ; एक दिवसाचा संप आता इतक्या दिवसांनी वाढवला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य शासनाकडून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू असल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी आक्रमक झाले आहेत. या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबरपासून पुकारण्यात आलेला एक दिवसाचा संप आता तीन दिवसांचा करण्यात आला आहे. सोमवारी पुणे परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
महावितरणमधील मीटर रीडिंग आणि बिलिंगचे काम अदानी उद्योग समूहाला देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. यामुळे महावितरणचा वीज बिलिंग विभाग बंद होऊन खासगीकरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. २२ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या आंदोलनाचा आता शेवटचा टप्पा सुरू झाला असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
आंदोलनाचा पुढील भाग म्हणून मंगळवारी, दि. ७ ऑक्टोबर रोजी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर द्वारसभा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. या सभेत शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध केला जाईल, तसेच यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी होणारा एकदिवसीय संप आता ९ ते ११ ऑक्टोबर असा तीन दिवस चालणार आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव ईश्वर वाबळे आणि सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे विश्वास भोसले यांनी दिला आहे.





