Adani Group: पायाभूत सुविधा विकसन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आदानी समूहाने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला आवश्यक असलेली डेटा सेंटर उभारण्यासाठी पुढील दशकात शंभर अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. डेटा सेंटरमधील गुंतवणूक एआय क्षेत्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेली गुंतवणूक ठरणार आहे. या क्षेत्रात भारत आघाडीवर राहावा यासाठी अदानी समूहाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. ही डेटा सेंटर 2035 मध्ये उपलब्ध होतील आणि यासाठी केवळ हरित ऊजचा वापर केला जाणार आहे. यामुळे भारत डेटा सेंटरमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर राहणार आहे. भारत सरकार व भारतातील कंपन्या या क्षेत्रामध्ये पुढील दशकात 250 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जाते. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी सांगितले की औद्योगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील क्रांती ही मानवी उत्क्रांतीतील सर्वात मोठी क्रांती आहे. या क्षेत्रात भारत आघाडीवर राहणार आहे. भारत सरकारबरोबर भारतातील खासगी क्षेत्र या क्षेत्रात पुढाकार घेत आहेत. भारत फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादने खरेदी करणार नाही तर ती विकसित करणार आहे आणि त्याची निर्यातही करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अदानी यांनी केलेल्या या घोषणेनंतर या समूहाच्या शेअरच्या भावात अडीच टक्क्यापर्यंत वाढ झाली होती.