Pune News : महावितरणचे संचालक राजेंद्र पवार दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे : महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना मंगळवारी ‘दिव्यांग भूषण पुरस्कार’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी व अधिकारी संघटना, मुंबई यांच्या वतीने राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली महावितरणमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण आणि मैलाचे दगड ठरतील असे निर्णय घेण्यात आले आहेत.
विशेषतः, दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि नियुक्ती प्रक्रियेत कोणत्याही परिस्थितीत योग्य न्याय मिळावा यासाठी संचालक राजेंद्र पवार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच महावितरणमधील दिव्यांग बांधवांमध्ये एक मोठा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
यावेळी संघटनेचे विद्युत विभागाचे अध्यक्ष विलास शिंदे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चव्हाण, रंजन बल्लमवार तसेच महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांच्यासह संघटना आणि महावितरणचे अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.





