Pune District : महाविस्तार अॅप ठरणार शेतकऱ्यांना ‘डिजिटल मार्गदर्शक’
Pune District : विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अॅपमधील मराठी चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी मजकूर किंवा आवाजाद्वारे प्रश्न विचारू शकतात.

वाल्हे : कृषी विभागाने विकसित केलेले वन स्टॉप सोल्यूशन अॅप शेतकऱ्यांसाठी ‘डिजिटल मार्गदर्शक’ म्हणून काम करणार असल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी संतोष जायपत्रे यांनी वाल्हे (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांना महाविस्तार (एआय) अॅपविषयी मार्गदर्शन करताना दिली.
या अॅपद्वारे हवामान अंदाज, पीक लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन, बाजारभाव, गोदाम सुविधा, मृदा आरोग्य अहवाल तसेच ‘डीबीटी’ वरील विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अॅपमधील मराठी चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी मजकूर किंवा आवाजाद्वारे प्रश्न विचारू शकतात. काही क्षणातच संबंधित सल्ला उपलब्ध होतो, हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे. ‘महाविस्तार’ अॅपचा घेण्यासाठी शेतकरी फार्मर आयडीद्वारे नोंदणी करू शकतात. शेतकऱ्यांना अचूक, वैयक्तिक गरजेनुसार सल्ला देणे शक्य होत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावेळी बजरंग पवार, लता पवार, तुषार पवार, शिवाजी पवार, दादा पवार, राहुल पवार आदी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी, पुरंदर श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, जेजुरी मंडलातील बहुतांश शेतकऱ्यांनी आतापर्यंत ‘महाविस्तार’ अॅपचा वापर सुरू केला आहे, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी जायपत्रे यांनी दिली. शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार’ अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





