पुणे | पुण्यात महाविकास आघाडीचा फाॅर्मूला ठरला?

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – अगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी पुण्यात पक्षाला ६ जागांची मागणी केली असली तरी वरिष्ठ पातळीवर पुण्याचा जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झालेली आहे. काँग्रेसला ३ जागा दिल्या जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ३ तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २ जागा मिळणार आहे.
पुण्यातील हडपसर आणि वडगावशेरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केला असल्याने या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने या जागेबाबत शेवटी निर्णय घेतला जाणार आहे,
त्यामुळे, स्थानिक पातळीवर वाद असले तरी तीनही पक्षाच्या नेत्यांंकडून ज्या जागा निश्चित आहेत त्यावर काम सुरू करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे शहरात विधानसभेच्या आठ जागा असून २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत ६ जागांवर भाजपचे तर राष्ट्रवादीचे २ जागांवर उमेदवार निवडून आले होते. मात्र. २०२३ झालेल्या कसबा विधानसभा पोट निवडणूकीत एक जागा काॅग्रेसच्या वाट्याला आली आहे.
जागा वाटपात कसरत…
राज्यात घडलेल्या सत्ता समिकरणानंतर या विधानसभेला राजकीय चित्र पूर्णत: भिन्न असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडली असून एक गट महाविकास आघाडीत तर एक गट महायुतीत आहे. त्यामुळे जागा वाटप करताना सर्वच राजकीय पक्षांची कसरत असणार आहे.
तीनही पक्षांच्या प्राथमिक चर्चेनुसार पुण्यात कसबा, पुणे कॅन्टोमेंट आणि शिवाजीनगर या तीनही जागा काँग्रेसकडे असणार आहेत. तर खडकवासला, पर्वती, हडपसर या जागा राष्ट्रवादीला असणार आहेत तर कोथरूड आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनाला गृहीत धरण्यात आलेला आहे.
शिवसेना- राष्ट्रवादीत तिढा…
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे.
हडपसर मधून पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छूक आहेत तर शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर इच्छूक असून लोकसभा निवडणुकीत बाबर हे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारात सक्रीय असल्याचे दिसून आले.
त्यामुळे या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हडपसर राष्ट्रवादीला सोडल्यास वडगावशेरी शिवसेनेला मिळणार, हे निश्चित आहे. तर, शिवसेनेकडून खडकवासला मतदारसंघाची मागणीही करण्यात येत होती.
मात्र, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके काही मतांनी पराभूत झाले होते. तसेच ते राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पवार गटाकडे थांबले असल्याने ही जागा राष्ट्रवादी मागणार हे निश्चित आहे.





