राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार; शरद पवारांनी व्यक्त केला निर्धार

सातारा : तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. सभेपूर्वी आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि शरद पवार यांची एकत्र बैठक झाली. मात्र, रामराजे यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला नाही.
नंतर झालेल्या सभेत शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये फलटणकरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र योग्य व्यक्तींच्या हातात द्यायचा आहे, म्हणून ही लढाई सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच २०१४ पासून पाच वर्ष राज्य होतं. तेव्हा त्यांना बहीण दिसली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडी जिंकल्यानंतर यांना सर्व समाज आणि लाडक्या बहिणी आठवल्या.
राजकारण्यांपेक्षा लोक अधिक शहाणे आहेत. त्यांना कळतं, कोणत्या वेळी काय करायचं आहे ते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता योग्य तो निर्णय यावेळी घेणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे, मी स्वतः काही निवडणुकीचा उमेदवार नाही. परंतु, महाराष्ट्राची या लोकांनी वाईट परिस्थिती केली आहे. ती काढून योग्य व्यक्तीकडे सत्ता देण्यासाठी आत्ताची लढाई आहे.
राज्यातील लोकांनी मला चार वेळा मुख्यमंत्री केले. मी सतत लोकांचे आणि समाजाचे भलं केलं आहे. मला महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचं आहे, म्हणून आता सत्ताबदल अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना अमेरिकी कंपनी कमिन्स उद्योग फलटणला उभारण्यासाठी प्रवृत्त केले, असे सांगून पवार म्हणाले, महाराष्ट्रात चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता आहे. यांना आया बहिणीची काळजी नाही. त्यांची सुरक्षा तुम्ही करू शकत नाही. कोणतीही कायदा सुव्यवस्था नाही.
सामान्य माणसाला सन्मानाने जगता येत नाही. हे राज्य पुढे न्यायचे आहे. त्यांचे हात वेगवेगळ्या भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संरक्षण करता येत नाही. राज्यभर, मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यापासून अनेक ठिकाणी मागील शंभर वर्षांपासून पुतळे आहेत. परंतु, या पुतळ्यांना कोणताही धोका पोहोचत नाही किंवा धक्का लागत नाही. आजही ते ऊन वारा पावसामध्ये उभे आहेत.
कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जोरदार वाऱ्यामुळे उध्वस्त होतो. पुतळा उभारताना या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. सर्वसामान्य माणसांनी आता यांच्या हातातून सत्ता काढून घेणे गरजेचे झाले आहे. फलटण येथे कार्यकर्त्यांवर किती अन्याय झाला ते मला माहित आहे. फलटणकरांनी किती अन्याय सहन केला हेही मला माहित आहे.
भूलथापांना बळी पडून नुसत्या घोषणा आणि निवडणुकीचे जुमले बांधण्यात समोरचे लोक व्यस्त आहेत. तुम्ही जागरूक राहा. त्यांच्या नादी लागू नका, असे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार अमोल कोल्हे, उत्तम जानकर, धैर्यशील मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.
मला अजून खूप काम करायचेय!
माझं वय ८४ झाले असले, तरी मी काही म्हातारा झालो नाही. मलाही अजून खूप काही जगायचे आहे आणि काम करायचे आहे. येथील सामान्य माणसाला जोपर्यंत सन्मान मिळवून देत नाही. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. योग्य लोकांच्या हातात सत्ता देत नाही तोपर्यंत मलाही समाधान मिळणार नाही. या निवडणुकीत देशभर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आवाज पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले.





