महाविकास आघाडी सरकार हिंदूविरोधी

नगर -राज्यातील महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी आहे. लव्ह जिहाद, धर्मांतराची सक्ती करण्यापर्यंत प्रकार घडू लागले असतानाही पोलीस कारवाई करणार नसतील तर आता कायदा सुव्यवस्था अवघड होईल. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप नाही तर राज्य सरकारच करत आहे, असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नगर दौऱ्यावर आलेले आ. राणे यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि एकूणच राज्य सरकारच्या कारभारावर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष मिलिंद गंधे आदी उपस्थित होते.
नगर दौऱ्याबाबत माहिती देताना राणे म्हणाले की, जिल्ह्यातील धर्मांतराच्या घटना, लव्ह जिहादच्या घटना आणि रामनवमीच्या मिरवणुकीत काही ठिकाणी घडलेले अनुचित प्रकार यासंबंधी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यांना जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांबाबत माहिती दिली तसेच याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर योग्य कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देणार असल्याचा इशारा दिला.
राणे म्हणाले की, पीडित नागरिकांनी अनेकदा भेटी घेऊन, निवेदने देऊनही कारवाई होत नसेल तर आम्ही या लोकांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. या प्रकरणांची दखल घेऊन कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, तसे काही होत नाही. कायदा सुव्यवस्था राखणे हे काम प्रशासनाचे आहे मात्र तसे होताना जिल्ह्यात दिसत नाही. या सर्व गोष्टी सरकारच्या आदेशानेच होत आहेत. प्रशासनही सरकारच्या इशाऱ्यावरच काम करत आहे. त्यामुळे अगदी नावासहीत तक्रार केल्यानंतर सुद्धा धर्मांतर करणाऱ्या कमलसिंग नावाच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. हा व्यक्ती सरकारचा जावई आहे का, असा सवाल करत सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.





