Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गाडे पुढे सरकेना

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावर चुरस आहे. शिवसेना काही जागांच्या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसशीही असहमत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपात कोंडी निर्माण झाली आहे.
राज्यातील १०० जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एकमत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात केवळ १५ ते २० जागांवर चुरस आहे. आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक होणार असून, त्यात उर्वरित जागांवर निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये बैठक झाली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना ज्या जागांवर एकमेकांविरोधात लढले होते, त्यापैकी काही जागांवर सहमती होत नसल्याची माहितीही समोर आली आहे. यापैकी दोन्ही पक्षांनी 15 ते 20 जागांवर दावा केला आहे. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवरचे मतभेद दूर होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या विलंबासाठी काँग्रेसला जबाबदार धरले. संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस सध्या व्यस्त आहे, पण तरीही आम्ही त्यांना बोलावले आहे जेणेकरून जागावाटपाची चर्चा संपुष्टात येईल. ते खूप व्यस्त आहेत म्हणून ते तारखा देत आहेत.




