नवी दिल्ली – तुम्ही भारताच्या शेवटच्या पंतप्रधानांशी बोलत आहात असे पंडित नेहरू स्वत:च्या संदर्भात एका अमेरिकी राजदूतांना म्हणाले होते याची आठवण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी करून दिली. त्यावर जा तुम्ही त्या विरोधात केस करा असे त्यांना कॉंग्रेस प्रवक्त्याने सांगितले. नंतरही दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांत चांगलीच आतषबाजी झाली. निमित्त होते टीव्हीवरील चर्चेचे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही डिबेट ठेवण्यात आली होती. त्यात त्रिवेदी यांनी नेहरूंच्या त्या विधानाची आठवण करून दिल्यावर कॉंग्रेसचे नेते अभय दुबे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी त्यांच्या पुस्तकातच लिहिले आहे की माझ्या बैलगाडीला दोन चाके आहेत. एक जवाहरलाल आणि दुसरे सरदार (वल्लभभाई पटेल). एकाला भारताची नस चांगली माहिती आहे. तर दुसऱ्याची जागतिक स्तरावर चांगली ओळख आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू यांनाच माझे प्राधान्य आहे. मात्र भारतीय जनता पार्टीची हीच मोठी अडचण आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य करताना ते म्हणाले की, काश्मीरमधील कलम 370 आणि 35 अ हटवण्याचे आश्वासन तुम्ही दिले होते. त्यामुळे हजारो लोक काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकतील असे तुम्ही म्हणाला होतात. पण केवळ 29 बाहेरच्या लोकांनीच जमीनीचे छोटे तुकडे काश्मीरमध्ये विकत घेतले असल्याचे तुम्हीच मार्च महिन्यात जाहीर केले. असे असताना हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक कशी झाली, 64 हजार काश्मीरींचे पुनर्वसन करण्याचे तुम्ही बोलले होते त्याचे काय झाले? त्याला भाजपच्या त्रिवेदी यांनी उत्तर दिले. नेहरू किंवा अन्य कोणी नेता आमच्या राजकीय मतपेढीचे साधन नाहीत. आमचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वतंत्र भारतात काश्मीरसाठी पहिले बलिदान दिले. जनसंघाच्या वेळेपासूनच आमचा नारा आहे की जेथे मुखर्जी यांचे बलिदान झाले तो काश्मीर आमचा आहे. पूर्ण काश्मीर आमचा आहे. गुंतवणुकीबाबत बोलायचे झाले तर 2019 नंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 56 हजार कोटींची गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.