Mahashivratri 2022 : औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द

हिंगोली – श्री औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा करोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत. मात्र, या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडे असणार असल्याचे संस्थानाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाशिवरात्री यात्रेवर निर्बंध होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच करोनाचे निर्बंध शिथिल झाले असताना ही यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे भाविकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सलग तीन वर्ष यात्रा रद्द झाल्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरदेखील मोठा परिणाम झाला आहे.
दरवर्षी 26 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत भरणाऱ्या या यात्रेमध्ये प्रचंड प्रमाणात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो. राज्यासह देशभरातून भाविका नागनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र यात्रा रद्द झाल्यामुळे उत्साह कमी असल्याचे चित्र आहे.





