दिल्ली वार्ता : हास्य आणि रुसवा!

हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा कोणत्याही कामकाजावाचून संपला आहे. असं असलं तरी, संसदेच्या आवारात दोन गोष्टींचीच चर्चा सर्वाधिक होती. पहिली, प्रियंका गांधी यांचा शपथविधी आणि दुसरी महाराष्ट्राचा ‘मुख्यमंत्री’!
दिल्लीत थंडीची सुरुवात झाली असताना संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 18व्या लोकसभेचं तृतीय आणि पहिलं हिवाळी अधिवेशन होय. तर राज्यसभेचं 266 वे अधिवेशन होय. अधिवेशनाचा पहिला आठवडा राजकीय घडामोडींनी गाजला. विरोधकांनी गोंधळ करून सरकारला नामोहरम करून सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिवेशनाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं.
थोडक्यात, संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणतंही कामकाज होऊ शकलं नाही. अमेरिकेने उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्यामुळे काँग्रेसच्या हातात सरकारच्या विरोधात आयते कोलीत मिळाले. काँग्रेसने त्याचा उपयोगसुद्धा केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे खासदार गोंधळ घालत होते. हा प्रकार आठवडाभर सुरू होता.
याशिवाय, महाराष्ट्राच्या निकालानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांचे गुरुवारी प्रथमच दिल्लीला आले होते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काहीही कामकाज झालं नसलं तरी हे अधिवेशन इतिहासात दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहणार आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची लेक आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांचा लोकसभेच्या खासदार म्हणून झालेला शपथविधी.
प्रियंका गांधी या केरळची पारंपरिक साडी परिधान करून शपथ घेण्यासाठी आल्या होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसत होत्या. अर्थात नात अगदी हुबेहुब आजीसारख्या दिसत होत्या. राहुल गांधी यांनी फोटोग्राफरची भूमिका बजावली. याशिवाय, संसदेच्या आवारात आणखी एका विषयाची सर्वाधिक चर्चा आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची. दिल्लीच्या थंडीतही या घडामोडींनी संसदेतील तापमान वाढविले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
नवीन संसद आणि संविधान सदन (जुनी संसद) या दोन्ही इमारतीच्या मधे थोडी मोकळी जागा आहे. येथेच मकर द्वार आहे. लोकप्रतिनिधींसाठी संसदेत प्रवेश करण्याचे हे मुख्य द्वार. केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, प्रिंट आणि वृत्तवाहिनींचे पत्रकार, येणारे जाणारे या सर्वांचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे ही मोकळी जागा.
संसदेच्या परिसरात चार-पाच मोठ्या इमारती आहेत. यात नवीन संसद भवन, संविधान सदन, संसदेची विस्तारित इमारत आणि लायब्ररी बिल्डिंग याचा प्रामुख्याने समावेश होतो. या इमारतींमध्ये जवळपास पाच-सहा कँटीन आहे. याशिवाय, खासदारांसाठी नवीन संसदेत तळ मजला आणि पहिल्या माळ्यावर प्रत्येकी एक कँटीन आहे. याशिवाय दोन लायब्ररी आहेत.
या सर्व वास्तूंचा येथे उल्लेख करण्याचं कारण आहे या सर्व ठिकाणी येणारे-जाणारे, कँटीनमध्ये जेवायला येणारे कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या तोंडातून दिवसातून कितीतरी वेळा एकच प्रश्न निघायचा तो म्हणजे ‘महाराष्ट्र मे किसको बना रहें हैं मुख्यमंत्री’. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद म्हणजे लोकांचा उत्सुकता आणि टाइमपासचा महत्त्वाचा विषय!
यात गुरुवारी महाराष्ट्रातील आणखी एका विषयाची भर पडली ती अजित पवार यांची. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या चेहर्यावरील स्मितहास्याने राजकीय विश्लेषकांचे काम खूप सोपे केले. याशिवाय, गंभीर आणि क्षणात सोक्षमोक्ष लावणारा नेता अशी अजितदादांची दिल्लीत प्रतिमा होती. ती या स्मितहास्यामुळे पुसली गेली.
राकाँ कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रकाबगंज रोडवरील 26 नंबरच्या बंगल्यात गुरुवारी पत्रकारांना हात धुण्यासाठी बोलाविले होते. या ठिकाणी अजित पवारपण होते. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अजित पवार सकाळी साडेदहा वाजताच दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होते.
शहा यांची भेट रात्री होणार होती. अशात, पूर्ण दिवस हाताशी असल्यामुळे पटेल यांनी पत्रकारांना बोलाविले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषांतील जवळपास 100 ते 150 पत्रकार जमले होते. अजित पवार पत्रकारांच्या एका गटासोबत गप्पा करीत होते. प्रफुल्ल पटेल दुसर्या गटासोबत चर्चा करीत होते. तटकरे काही पत्रकारांशी बोलत होते, तर सुनेत्रा पवार काही महिला पत्रकारांसोबत गप्पा-टप्पा करीत होत्या. चिरंजीव पार्थ पवार यांनीसुद्धा पत्रकारांच्या एका गटाशी चर्चा केली. अधूनमधून सर्वच नेते इकडे-तिकडे टेबलवर बसलेल्या पत्रकारांजवळ जाऊन ‘सावकाश होऊ द्या’ म्हणत गप्पा मारत होते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या उगम स्थानापासून ते पुढील सरकार स्थापन करण्यापर्यंतच्या सर्व बारीक-बारीक गुप्त गोष्टींबाबत पत्रकार विचारणा करीत होते. मग यात दोन पक्षाचे चार पक्ष कसे झालेत यापासून सर्वच विषय आले.
दिल्लीतील सौम्य थंडी आणि दुपारचे ऊन अशा वातावरणात दादांचं कुटुंब आणि पत्रकार यांचा जो फड रंगला तो कमालच! यात भर पडली ती दादांच्या स्मितहास्याची. ‘दादा आपकी मुस्कुराहट का राज क्या हैं?’ असा प्रश्न जवळपास प्रत्येक पत्रकारांना पडला आणि काहींनी तर दादांना चक्क विचारलं. हा प्रश्न ऐकून दादा आणखी खळखळून हसायचे! मात्र, दादा यांच्या चेहर्यावरील हास्य मिलियन डॉलरचे आहे, हे रहस्य उलगडलं ते रात्री बारा सव्वाबाराच्या सुमारास.
गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीतील नेत्यांचा ग्रुप फोटो व्हायरल झाला आणि दादांच्या हास्याचं कारण लोकांच्या लक्षात आलं. या फोटोमध्ये शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. सर्वांचाच चेहरा हसरा होता. पण फक्त दादांचे हास्यच खरे वाटत होते. उर्वरित चेहर्यावरील हास्य दबावातील दिसत होते. शहा यांच्यासोबतच्या हायप्रोफाइल बैठकीतही शिंदे यांची नाराजी दूर होऊ शकली नाही आणि चर्चा अर्धवट राहिली. शहा यांनी राज्यांतील नेत्यांना आपसात चर्चा करून तिढा सोडविण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु शिंदे आपल्या गावाला गेले.
नवीन सरकारमध्येही दोन उपमुख्यमंत्री असतील. अशात, एका उपमुख्यमंत्र्याला गृहखाते देण्यात यावे आणि दुसर्या उपमुख्यमंत्र्याला अर्थखाते देण्यात यावे, असं शिंदे यांचं म्हणणं आहे. यास भाजपचा विरोध आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याकडे अर्थखाते राहणार आहे. परंतु, भाजप सेनेच्या उपमुख्यमंत्र्याना गृह मंत्रालय देण्यास तयार नाही. फडणवीस गृहखाते स्वतःकडेच ठेवणार असतील, तर दुसर्या उपमुख्यमंत्र्यांनी काय करायचं? असा त्यांचा प्रश्न आहे.





