Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप; मुसळधार पावसाला ब्रेक…
Maharashtra Weather Update :

Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र मागील काही दिवसात पाहायला मिळालं. परंतु अद्यापही काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यातच आता राज्यामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. त्यामुळे पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.
जुलैच्या सुरुवातीला राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र ८ जुलैनंतर अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून हवामानात बदल जाणवत आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही इशारा देण्यात आला नसून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही बहुतांश ठिकाणी कोरडे ते अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तर 12 जुलैपासून पूर्व विदर्भातून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे ढग गायब
प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचा थेट परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला आहे. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यामुळे मान्सूनचे ढग गायब झाले आहेत. त्यामुळे १० ते १५ जुलै दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटणार आहे.
पुढील काही दिवस पाऊस गायब होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पाऊस सलग न पडता मोठा खंड घेत पडू शकतो. परंतु याचा परिणाम राज्यातील खरीप पिकांवर होऊ शकतो. Maharashtra Weather Update
पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?
सध्या पाऊस गायब झाला असला तरी जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र सध्या जवळपास 15 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहील. उघडीप कायम राहिल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा:






