Maharashtra Weather : सकाळी अन् रात्री हवेत गारवा! तर दिवसा हवामान कोरडं…
Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कोणताही अलर्ट जारी नाही

Maharashtra Weather : ऐन दिवाळीत राज्यात थंडीची चाहूल जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवेत गारवा जाणवत आहे, तर दुपारी कोरडे हवामान आहे. त्यानुसार पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला, तरी रात्री आणि पहाटे हवेत गारवा निर्माण होत आहे. पुढील काही दिवस हे संमिश्र हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातही थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागात मागील काही दिवसांपासून उष्ण हवामान कायम आहे. येथे कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस या भागात पावसाची शक्यता नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातही उष्ण आणि थंड अशा दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. विदर्भातही पुढील चार ते पाच दिवस हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. येथेही दिवसा उष्ण आणि कोरडे हवामान, तर रात्री काहीसा गारवा जाणवणार आहे.
हेही वाचा:





