Top 15 News: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार?, निवडणूक प्रचारात सहभागी होण्यावर निर्बंध आणि सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावरून कंगनाचे गंभीर सवाल, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News:

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार?
सुनील तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका;
Top 15 News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघेच निर्णय घेऊ शकतात. आमच्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, असेही तटकरे म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे विलिनीकरणासाठी भाजप दबाव टाकत आहे का आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
‘दोन्ही राष्ट्रवादी मिळून तिसरा गट होईल’;
संजय शिरसाटांचा टोला
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रम वाढला आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सुनील तटकरे यांनी बारामतीत सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांची भेट घेतली. विलिनीकरणाबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, असे तटकरे म्हणाले. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही राष्ट्रवादींवर टीका करत, ‘दोन्ही पक्ष मिळून तिसरा गट निर्माण होतो की काय?’ असा सवाल उपस्थित केला.
अजित पवारांच्या घातपाताचा संशय;
उमेश पाटील म्हणाले, ‘एक दिवस पुराव्यांसह बोलेन’
अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केला. माझ्याकडे सध्या पुरावा नसला तरी एक दिवस याबाबत बोलेन, असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. बारामतीत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चाही फेटाळल्या. सध्या अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आधी भीमा कारखाना सुरळीत चालवा’;
सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील निवडून आल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या टीकेला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ‘महाडिकांनी आधी आपल्या भीमा साखर कारखान्यावर फेरी मारावी आणि तो सुरळीत चालवावा. तेथील कामगारांना पगार मिळत नाही, कारखान्यावर जप्ती आली आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. गोकुळमध्ये आमचे १३ उमेदवार निवडून आले असून न्यायालयात बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी १.२१ लाखांचे अनुदान;
दुष्काळात पशुधनाला मिळणार आधार
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हीबी-जी रामजी योजनेतून चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयामुळे चारा उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. तसेच चारा लागवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे.
RNO -गोकुळच्या राजकारणाला बाजूला ठेवा;
दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र या, बावनकुळेंचे आवाहन
कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीनंतर राजकारण बाजूला ठेवून सर्व संचालकांनी एकत्र काम करावे, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. निवडणुकीत विजय-पराभव होत असतो; मात्र साडेपाच लाख कुटुंबांचे हित महत्त्वाचे आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे ते म्हणाले. दरम्यान, कुही तालुक्यातील ससेगाव येथे गोपाळ समाजासाठी मार्चपर्यंत ७५ घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील नागरिकांना घरांचे पट्टे आणि मुलांना जन्मदाखले उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
RNO – ‘भाजपची अवस्था सिकंदरपेक्षाही वाईट होईल’;
राजू शेट्टींचा कोल्हापुरातून इशारा
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘जगज्जेता सिकंदरपेक्षाही भाजपची अवस्था वाईट होईल. त्याची सुरुवात कोल्हापूरकर करतील, हे भाजपने लक्षात ठेवावे,’ असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
RNO -पाच हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळले एकविरा देवी मंदिर;
दिवाळी पाडव्याला भव्य दीपोत्सव!
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने धुळ्यातील खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल पाच हजार दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. आकर्षक दीपसजावटीमुळे मंदिराला विशेष झळाळी प्राप्त झाली होती. यावेळी देवीला मिठाईचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. दिव्यांचा लख्ख प्रकाश, भआरतीचा गजर आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेला हा दीपोत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला.
RNO – ११०० पदार्थांचा भगवान स्वामीनारायणांना नैवेद्य;
धुळ्यात अन्नकूट महोत्सव उत्साहात!
दिवाळी पाडव्याच्या बलिप्रतिपदेनिमित्त धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात भव्य अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भगवान स्वामीनारायण यांना तब्बल ११०० विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. मिठाई, फराळ आणि विविध पक्वान्नांच्या आकर्षक राशी मंदिरात सजवण्यात आल्या होत्या. अन्नकूटाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. स्वामीनारायण संप्रदायाच्या परंपरेनुसार आयोजित या महोत्सवामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिवाळीचा उत्साह आणि विविध पदार्थांची आकर्षक सजावट हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
RNO – दुष्काळात बळीराजाचे पूजन;
शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी!
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आदिवासी संस्कृतीनुसार बळीराजाचे पूजन करण्यात आले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, शेतमजुरांना वार्षिक ४८ हजार रुपये आणि ग्रामीण कुटुंबांना ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याची मागणी करण्यात आली. कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने नांगर आणि धान्याचे पूजन करण्यात आले. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या सन्मानाने जगण्याचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यावेळी कॉ. विक्रम गावित, जमुनाताई ठाकरे, मनोहर वळवी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
निवडणूक प्रचारात सहभागी होण्यावर निर्बंध;
निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही निवडणूक आयोगाचा दणका!
निवडणूक प्रचाराबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. यापुढे केवळ सेवेत असलेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर निवृत्त अधिकाऱ्यांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही. राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनाही हे निर्बंध लागू असतील. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. आचारसंहितेच्या काळात नियमांचे उल्लंघन गंभीर मानले जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
देशातील ७ राज्यांना पावसाचा इशारा;
कुठे मुसळधार पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी?
देशातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर तामिळनाडू, केरळ आणि अंदमान बेटांवर पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीची चाहूल लागली असून सकाळी धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुबईत सोन्या-हिऱ्यांची शाही रांगोळी!
६.५ किलो सोनं, ३८० कॅरेट हिऱ्यांनी सजली कलाकृती
दिवाळीच्या पारंपरिक रांगोळीला दुबईत शाही साज चढवण्यात आला आहे. दुबईतील सिटी सेंटर डेरा येथे तब्बल ६.५ किलो सोनं आणि ३८० कॅरेटपेक्षा अधिक हिऱ्यांचा वापर करून भव्य रांगोळी साकारण्यात आली. यासाठी २१३ सोन्याच्या दागिन्यांची मांडणी करण्यात आली असून, १० कारागिरांनी सलग १६ तास मेहनत घेतली. दमास कंपनीने ही अनोखी कलाकृती साकारली आहे. या सोन्या-हिऱ्यांच्या रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
‘हॅलो स्किपर!’ सँटनरच्या वक्तव्याने रोहितच्या कर्णधारपदाची चर्चा
हिटमॅनची प्रतिक्रिया व्हायरल
आयपीएल २०२७ मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. भारत-न्यूझीलंड सामन्यानंतर हस्तांदोलन करताना मिचेल सँटनरने रोहितला ‘हॅलो, स्किपर’ असे म्हटले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितने मुंबईला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र, २०२४ पासून हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत आहे. सँटनरच्या या एका शब्दामुळे रोहितच्या पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, याबाबत मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केलेली नाही.
सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावरून कंगनाचे गंभीर सवाल;
गांधी कुटुंबाबाबतच्या पोस्टने खळबळ
सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गांधी कुटुंबाच्या राजकीय इतिहासाबाबत अनेक सवाल उपस्थित केले. सोनिया गांधी यांच्या भारतातील प्रवेशापासून ते गांधी कुटुंबातील प्रमुख नेत्यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी संशय व्यक्त केला. तसेच मनेका गांधी यांच्याशी संबंधित एका व्हिडीओवरही भाष्य केले. मात्र, कंगना यांनी केलेले हे दावे त्यांचे वैयक्तिक आरोप असून त्यांना पुष्टी देणारे पुरावे दिलेले नाहीत.





