Ranji Trophy 2025 : ऋतुराज-पृथ्वीच्या खेळीवर पावसाने फेरलं पाणी, महाराष्ट्र-केरळ सामना अनिर्णीत!

MAH vs KER Ranji Trophy 2025 Match Draw : महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफीचा सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अखेर अनिर्णीत राहिला. चारही दिवस पावसाने हजेरी लावल्याने खेळाला मोठा अडथळा निर्माण झाला. पहिल्या डावात आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतरही महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत २० धावांची आघाडी मिळवली होती.
पहिल्या डावात महाराष्ट्राला ऋतुराजने सावरले –
महाराष्ट्राने पहिल्या डावात ५ बाद १८ अशा नाजूक स्थितीतून सावरताना कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या ९१ आणि जलज सक्सेनाच्या ४९ धावांच्या जोरावर ८४.१ षटकांत सर्वबाद २३९ धावा उभारल्या. केरळकडून एमडी निधीशने ५, तर नेदुमंकुझी बेसिलने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात केरळने यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या ५४ आणि सलमान निजारच्या ४९ धावांच्या खेळीच्या बळावर ६३.२ षटकांत सर्वबाद २१९ धावा केल्या. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने गडी बाद करत केरळला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या आघाडीच्या फलंदाजांनी जोरदार पुनरागमन –
The players shake hands!
The Kerala vs Maharashtra match ends in a draw.
Maharashtra took the 1st innings lead.
Ruturaj Gaikwad & Siddhesh Veer hit 50s and stitched a 100-run stand as Maharashtra stretched their lead to 244 in the 2nd innings before the teams shook hands.… pic.twitter.com/uriq0uL8gh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 18, 2025
तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला. तोपर्यंत महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद ७१ धावा केल्या होत्या. चौथ्या आणि अंतिम दिवशीही पावसामुळे खेळात अडथळा आणला आणि सामना लवकर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या आघाडीच्या फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. सलामीवीर पृथ्वी शॉ (१०२ चेंडूत ७५), सिद्धेश वीर आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतके झळकावत संघाला भक्कम पाया दिला.
अखेर पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला –
सामन्याच्या शेवटी महाराष्ट्राने ७१ षटकांत २ बाद २२४ धावा केल्या. केरळकडून अक्षय चंद्रन आणि बेसिल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला असला, तरी महाराष्ट्राच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातील संयमी आणि आक्रमक खेळाने आपली क्षमता दाखवली.





