नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली आहे. मात्र अद्याप सत्ताधारी महायुती किंवा विरोधी महाविकासआघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. वरीष्ठ नेते अजूनही जागावाटपाचा तिढा सोडवण्यात गुंतले आहे. अनेक जागांवर निर्णय झालेला असून अगदी थोड्या जागांसाठी आता एकमेकांना समजून घेण्याची विनंती केली जात आहे. अशातच जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीसीठी दिल्लीला पोहोचले. या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा जवळपास निकाली लागला असून लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली दौऱ्यानंतर चंदीगडमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंदीगडमध्ये जागा वाटप संदर्भात बैठक झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. नेमकं काय घडलं? दरम्यान, पहिल्यांदा चंदीगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रूममधून बाहेर पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी थांबवले. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही 15 ते 20 मिनिटांची चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मात्र हॉटेल बाहेर थांबले होते. दरम्यान, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती आहे. महायुतीच्या जागांबाबत दिल्लीत अमित शाहांच्या समक्ष चर्चा झाली. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अडीच तास चर्चा झाली. तीनही नेत्यांनी जागावाटपाचा तिढा सोडवला असल्याची माहिती आहे. आता केवळ काही जागांचाच प्रश्न बाकी आहे. अमित शाहांसोबत पार पडलेल्या बैठकीत जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरलेल्या अजित पवारांनी आपल्या आग्रह सोडावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. अन्य राजकीय पुनर्वसनात जास्तीचा लाभ देण्याचे अजित पवारांना आश्वासन देण्यात आले आहे.