Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा विधानपरिषदेसाठी नवा ‘गेम प्लॅन’! अमोल मिटकरींचा पत्ता कट? ‘या’ ३ नावांची जोरदार चर्चा
Sunetra Pawar : विधानपरिषदेच्या १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

Sunetra Pawar : राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १२ मे रोजी मतदान होणार असून, विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या एका जागेसाठी पक्षांतर्गत जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांची मुदत संपत असल्याने त्यांची जागा रिक्त होत आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
या जागेसाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत. उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी संधी हुकल्याने यावेळी त्यांना प्राधान्य मिळू शकते. त्याचबरोबर माजी खासदार आनंद परांजपे यांचे नावही चर्चेत आहे. संघटनात्मक कामकाज आणि प्रवक्ते म्हणून सक्रिय भूमिका यामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
याशिवाय मराठवाड्यातील सुरेशदाजी बिराजदार यांचेही नाव पुढे आले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांना संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या या निवडणुका सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा मानली जात आहे. पक्षातील अनेक इच्छुकांमधून नेमकी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





