Crop Damage – एक एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल’ म्हणून गमतीने साजरा केला जातो, मात्र शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी १ एप्रिल २०२६ हा दिवस काळा दिवस ठरला आहे. बुधवारी झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि गारपिटीने निसर्गाने शेतकऱ्यांना असे काही ‘एप्रिल फूल’ केले की, त्यामुळे कोहकडेवाडी आणि गुनाट परिसरातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा आता पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी, न्हावरे आणि कोहकडेवाडी या गावांना गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यामध्ये प्रामुख्याने ऊस, हरभरा, गहू, कांदा, डाळिंब आणि द्राक्ष या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे काढून पडलेले कांदे गारपिटीने सडकून निघाले, त्यांना ते तशा अवस्थेत काटून घ्यावे लागलेत. आता हा कांदा किती टिकेल, याबाबत शंका आहे. न काढलेले कांदे तर गेलेच. पन् काढलेले कांदेही सडणार. गुनाट आणि कोहकडेवाडी या दोन गावांमध्ये गारपिटीची तीव्रता सर्वाधिक होती, जिथे शेतात गारांचा खच साचल्याने उभी पिके जमिनीला टेकली आहेत. डाळिंबाच्या बागांमधील फळांचे नुकसान झाले असून कांद्याची पात पूर्णपणे पिवळी पडून सडली आहे. द्राक्ष बागांनाही या फटक्यातून सुटका मिळाली नसून उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीनंतर शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी शुक्रवार (दि. ३) रोजी बाधित क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, झालेल्या नुकसानीचा आकडा पाहता केवळ मदतीने काम भागणार नाही, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाकडून सध्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकसानीची दाहक आकडेवारी शिरूर तालुक्यातील अंदाजे १७ गावांमधील १३२६ हेक्टर क्षेत्र या गारपिटीमुळे बाधित झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २१९० शेतकरी या आपत्तीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून, गुनाट आणि कोहकडेवाडीत डाळिंब तर निमोणे व शिंदोडी परिसरात द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यावर नुकसानीची नेमकी रक्कम स्पष्ट होईल. पीककर्ज संपूर्ण माफ करण्याची मागणी गारपीटग्रस्त गुनाट गावातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे आपली व्यथा मांडली आहे. कांदा, डाळिंब, गहू आणि हरभरा या पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्यामुळे आता पुढील हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे भांडवल उरलेले नाही. त्यामुळे शासनाने या भागातील शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करावे, अशी आग्रही मागणी गुनाट ग्रामस्थांनी केली आहे.