महाराष्ट्रात अवकाळीचा कहर! गारपीट-वादळी पावसाने पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
Unseasonal Rain :

Unseasonal Rain : महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. बुधवारी दुपारी राज्यातील विविध भागांत गारपीट आणि वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) कडून राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्यासह गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. कापूरहोळ, किकवी आणि हरिश्चंद्री परिसरात गारांसह पावसामुळे अर्ध्या तासात पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीची भीती वाढली आहे.
तर सिन्नर येथेही अवकाळी पावसासह गारपीट झाली. कांदा, गहू आणि इतर पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल झाला असून लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांतही गारांचा पाऊस झाला.
अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले असून, पुढील दोन दिवस हवामान आणखी बिघडण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.





