महाराष्ट्र पर्यटनाला नवी उंची, अर्थसंकल्पात २,०८३ कोटींची तरतूद ; मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती

कोयनानगर : महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक विविधता आणि नैसर्गिक सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे. या पर्यटन क्षेत्राला आर्थिक विकासाची गती देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी तब्बल २,०८३ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. अशी माहिती पर्यटन, खणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंत्री देसाई यांनी सांगितले की, पुढील दहा वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, आरोग्य पर्यटन धोरण आखण्यात आले असून, राज्यात आरोग्य पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
शिवसृष्टी प्रकल्पाला विशेष भर : तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि इतिहास समजावा यासाठी ‘शिवसृष्टी’ सारखे प्रकल्प राबवले जाणार आहेत. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार असून, सांस्कृतिक जाणीवा अधिक दृढ होतील.
जल पर्यटन आणि स्कायवॉक प्रकल्पाला गती : सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यातील जल पर्यटनासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या भागातील पर्यटन स्थळे विकसित होणार आहेत. ठाणे आणि कोयनानगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कायवॉक उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे पर्यटकांना नवे अनुभव मिळतील तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.





